वटपौर्णिमा

वटपौर्णिमा… दिवसभर उपवास… जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी वटपूजा… सहजीवनाची एक सुंदर भावना… पण बऱयाचदा असा प्रश्न पडतो की ही भावना खरंच मन:पूर्वक असते की केवळ कर्मकांड आणि उपचार या दोनच गोष्टी उरतात…

आजची सावित्री वेगळी आहे –  सुप्रिया मंडलिक

नवऱ्यावरचं प्रेम क्यक्त करण्यासाठी फक्त उपकास करण्याची गरज नाही, पण तरीही आपला नवरा दीर्घायुष्यी व्हावा असे सर्वांनाच वाटते. आजची सावित्री फक्त चूल आणि मूल एकढय़ापुरतीच मर्यादित राहिली नाही, ती उंबरठय़ाबाहेर पडून समाजात वावरू लागली आहे. पुरुषांप्रमाणेच स्त्रियाही कामानिमित्त घराबाहेर पडतात. त्यामुळे साहजिकच उपवास केल्यावर थकवा येऊ शकतो. त्यामुळे मी पूर्णदिवस उपवास करत नाही पण, या सण साजरा करून नवऱ्यावरची निष्ठा दाखवते.

परंपरा म्हणून उपवास – चेतना चिंदरकर

मी तर वटपौर्णिमेचा उपवास परंपरा म्हणून करते. शिवाय नवऱ्यावर असलेले प्रेम आणि त्याचे आयुष्य आरोग्यदायी, उदंड व्हावे यासाठी उपवास करते. त्याची सोबत आपल्याला कायम मिळावी याची अपेक्षा असते. दुसरी गोष्ट या दिवशी बायकांना नटायला मिळते. त्यानिमित्ताने सोसायटीतल्या बायका नटून-थटून एकत्र जमतो. एकमेकींच्या थट्टामस्कऱ्या करतो आणि मग एकमेकींच्या घरी वाण घेऊन जातो. आम्हा मैत्रिणींना भेटण्याचे एक निमित्तही ते असतं. मी हा उपवास आनंदाने करते तो करायला मला आवडतो.

हौस म्हणून सण करावा – नरेंद्र बोंबाटकर

उपवास हवा असा काहीच अट्टहास नाही, पण शास्त्र म्हणून वटपौर्णिमेचा सण करावा. किमान त्या निमित्ताने स्त्रियांना नटायला, सजायला मिळते. सणाच्या निमित्ताने का होईना, एकमेकींना भेटायला मिळतं. ठेवणीतल्या साडय़ा त्या निमित्ताने बाहेर येतात. त्यामुळे जर नटण्या-सजण्यातून स्त्रियांना आत्मिक समाधान मिळत असेल तर हा सण साजरा करावा. उपवास करावा, करू नये हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, पण ज्या स्त्रिया हा उपवास करतात त्यांनी हौस म्हणून करावा. त्यासाठी कोणत्याच गोष्टींमध्ये अडकू नये.

सणामागचे अध्यात्म समजून घ्यावे – विजय  मेस्त्री

उपवास करावा की करू नये हा सर्वस्वी निर्णय माझ्या पत्नीचा असेल. आजच्या धावपळीच्या जीवनात मी तिच्याकडून ‘तू उपवास करच’ अशी अपेक्षा ठेवत नाही आणि तशी ठेवूही शकत नाही. माझी एवढीच अपेक्षा असेल की, तिने या सणामागचे माहात्म्य आणि अध्यात्म समजून घ्यावे. आपल्या हिंदू सणांना अध्यात्माची पार्श्वभूमी आहे. आपण सावित्रीची जी कथा ऐकतो ती कथा इच्छाशक्तीचे उत्तम उदाहरण आहे. माणूस मनात आणले तर काहीही करू शकतो याची प्रेरणा या कथेतून मिळते, पण आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत सगळ्यांनाच उपवास करणे शक्य होते असे नाही. अशा वेळी जर पत्नी स्वतःहून उपवास करत असेल तर त्यात आनंदच आहे आणि नाही केला तरीही तिच्या भावनेचा आदर नक्की करतो.

उपवासाचा अट्टहास नाही – संजय खाडे

पत्नीने उपवास करावाच असा अट्टहास नाही, परंतु ही फार वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे. सावित्रीने आपल्या पतीचा गेलेला प्राण परत मिळवला. ही कथा बऱयाचदा ऐकली आहे, हे केवळ संदर्भ आहेत. जन्मोजन्मी हाच नवरा मिळेल हे कोणी सांगितले? पुढचा जन्म कोणी पाहिला आहे? पत्नीने नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी उपवास करायचा आणि मग आम्ही पुरुष त्यांच्यासाठी उपवास करतो का ? त्यामुळे बायकोने हौस म्हणून हा सण करावा, पण उपवास करावाच असा अट्टहास अजिबात नाही.