गाता रहे मेरा दिल…

गाणं म्हणण्याची हौस प्रत्येकालाच असते. त्याला पार्श्वसंगीताची जोड मिळाली तर बात काही औरच! गोरेगावात शुभांगी देसाई यांनी या गाण्याच्या हौसेला व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

गाणं गुणगुणण्याची आवड प्रत्येकाला असते, पण त्याबरोबर संगीताची जोड मिळते तेव्हा गाणाराही खुलतो… हेच असतं ‘कराओके’ प्रकाराचं तंत्र… फक्त संगीताच्या ट्रकवर आपण कुणीही गाणे म्हणू शकतो. पण ते शास्त्रशुद्धपणे कसं गायचं… कराओके हा प्रकार म्हणजे काय… या सगळ्याचं रीतसर ट्रेनिंग मिळणं मात्र खूप महत्त्वाचं असतं. पण त्यात काय शिकायचं? संगीत लावायचं आणि त्यावर बोलायचं… असा विचार आपण प्रत्येकजण करतो. मात्र कराओके प्रकाराचं शास्त्रशुद्ध शिक्षण देण्याचं हे महत्त्वाचं काम गोरेगावात शुभांगी देसाई करत आहेत. तेथे त्यांनी प्रसिद्ध गायक सुनील नायर यांच्या मदतीने ‘कराओके ट्रेनिंग क्लास’च सुरू केला आहे. त्यांनी देशविदेशात गाण्यांचे चार हजारांहून जास्त कार्यक्रम केले आहेत. तेही शुभांगी यांच्यासह या केंद्रात शिकवायला येतात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांचा हा क्लास सुरू असून आता जवळपास ५० विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.

या कराओके क्लासतर्फे नुकतीच एक स्पर्धा घेण्यात आली. गोरेगाव आणि मालाड भागात राहणाऱ्या रहिवाशांसाठी ही स्पर्धा होती. या स्पर्धेची पहिली फेरी तीन महिन्यांपूर्वी झाली. ती ऑडिशन घेऊन घेतली गेली. त्यात ८० जणांना निवडण्यात आले होते. दुसरी फेरी मोठ्या हॉलमध्ये घेण्यात आली. त्यात २४जणांना निवडण्यात आले. त्यात दोन गट पाडण्यात आले होते. पहिल्या ग्रुपमध्ये प्रशिक्षित आणि व्यावसायिक गायकांना ठेवण्यात आले, तर दुसरा ग्रुप नवोदित आणि हौशी कलावंतांचा होता. या दोन्ही ग्रुपमध्ये १२-१२ जणांचा समावेश केलेला आहे. या दोन ग्रुपमध्ये शनिवारी १६ डिसेंबरला अंतिम फेरी ठेवली आहे, असे आयोजक अनिल देसाई म्हणाले.

पहिल्या ग्रुपमधून तिघेजण आणि दुसऱ्या ग्रुपमधून तिघेजण असे सहाजण अंतिम फेरीमध्ये निवडले जाणार असून या सहाजणांमधून पहिल्या तिघांना बक्षीस देण्यात येणार आहे. पहिल्या विजेत्याला ११,१११ रुपये रोख आणि चषक दिले जाणार आहेत, तर विजयी ठरलेल्या दुसऱ्या स्पर्धकाला ७,७७७ रुपये रोख आणि चषक देण्यात येतील, तर तिसरे बक्षीस ३,३३३ रुपये रोख आणि चषक असे ठेवण्यात आले आहे. एक उत्तेजनार्थ बक्षीसही ठेवण्यात आले आहे. अंतिम फेरी गोरेगाव पश्चिम येथील शास्त्रीनगर ग्राऊंडमध्ये सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत होणार आहे.

हा सोहळा गोरेगावात शनिवारी होणार असून त्यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई खास उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत पार्श्वगायक सुदेश भोसले, अभिनेता जॉन अब्राहम हेही येणार आहेत. विशेष अतिथी म्हणून न्यायमूर्ती सुशील कोचे, पार्श्वगायिका स्नेहा भूषण देसाई व शास्त्रीय गायक संजय नाडकर्णी असतील. यावेळी होणाऱ्या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अरविंद परुळेकर, वरुण बिडये आणि गिरीश छत्रे करणार आहेत, असेही देसाई म्हणाले.

शनिवारी होणार संस्थेचे नामकरण
या कराओके ट्रेनिंग क्लासला आतापर्यंत कोणतेही नाव नाही. पण १६ डिसेंबरला स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या निमित्ताने या क्लासचे ‘सूरश्री कराओके ट्रेनिंग क्लास’ असे नामकरण केले जाणार असल्याचेही अनिल देसाई म्हणाले. हे क्लास शनिवारी व रविवारी दुपारी २ ते ५ या वेळेत चालतात. या संस्थेत कराओकेवर कसे गाणे गायचे, सूर कसा धरायचा, ताल कसा लावायचा हे शिकवलं जातं. शुभांगी देसाई आणि सुनील नायर विद्यार्थ्यांना शिकवतात. येथून शिकून तरबेज झालेले अनेक विद्यार्थी पाहायला मिळतील