वरुण धवनला भेटण्यासाठी मुलीने सूरतहून काढला पळ

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड कलाकारांचे असे असंख्य चाहते असतात जे त्यांना एकदा भेटता यावं यासाठी काहीही करायला तयार असतात. अशीच एक घटना अभिनेता वरुण धवनसोबतही घडली आहे. वरुणची चाहती असलेल्या एका १४ वर्षीय मुलीने त्याला भेटता यावं यासाठी चक्क सूरतहून पळ काढला. या मुलीने कोणालाही न सांगता घरातून पळून येऊन थेट मुंबई गाठली. तसेच फक्त वरुणला भेटायला मिळेल या आशेने तिने रात्रभर त्याच्या खार येथील घराबाहेर बसून त्याची वाट पाहिल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय मुलगी शुक्रवारी कोणालाही न सांगता घरातून पळाली. सूरतमधील एका कपडे व्यापाऱ्याची मुलगी असून तिच्या आईवडिलांनी हरवल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. मुलीने शुक्रवारी दुपारी ३ च्या दरम्यान घरातून पळ काढत मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. मुंबईमध्ये आल्यावर तिने वरुण राहत असलेल्या इमारतीबाहेर बसून वरुणला भेटण्यासाठी हट्ट धरला. मात्र तेथील सुरक्षा रक्षकांनी वरुण घरी नसल्याने भेटता येणार नसल्याच सांगितलं. तेव्हा मुलीने आरडाओरडा करायला सुरुवात केली. त्यावेळी इमारतीतील एका व्यक्तीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत तिच्या आईवडिलांना संपूर्ण घटनेबाबत कळवलं. तसेच त्यानंतर मुलीला सुखरूप तिच्या घरी परत सोडण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.