लेख – ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ : तरुणांना सुवर्णसंधी

सुरेंद्र मुळीक

[email protected]

कोकणचा वेगाने होत असलेला विकास पाहता कोकण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे व्यवसायाचे केंद्र बनणार आहे यात शंका नाही. म्हणूनच कोकणच्या तिसऱ्या पिढीतील उच्च शिक्षित तरुण कोकणात व्यवसाय करण्याच्या तयारीला लागला आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवरच कोकण कॉन्क्लेव्हने रविवार 19 ऑगस्ट रोजी मुंबईत एका महापरिषदेचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे अत्यंत गांभीर्याने आणि पूर्णतः कॉर्पोरेट पद्धतीने ही महापरिषद होणार आहे. कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वच नवउद्योजकांत यातून दिशा मिळेल.

मुंबईतील ‘सहारा स्टार’ येथे 19 ऑगस्ट रोजी कोकणातील पर्यटन आणि उद्योगसंदर्भात ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ने एका महापरिषदेचे आयोजन केले आहे. कोकणासंदर्भात अशा प्रकारची भव्य महापरिषद महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात प्रथमच होत आहे. यामुळे या महापरिषदेचे सर्वांनीच स्वागत करावयास हवे. याचा अर्थ यापूर्वी कोकणचा उद्योग व्यवसायसंदर्भात असे प्रयत्न झाले नाहीत असेही नाही. कोकणचे सौंदर्य, तेथील संस्कृती, तेथील पर्यटन स्थळांचे दर्शन विविध माध्यमांतून घडविण्याचा अनेक संस्थांनी प्रयत्न केला. माझ्या माहितीनुसार 1988 साली दादर, शिवाजी पार्क येथे सुरू झालेल्या कोकणच्या पहिल्या जत्रेने कोकणच्या निसर्गाला, संस्कृतीला आणि व्यवसायाला मुंबईचे दरवाजे उघडून दिले. त्यानंतर अनेक वर्षे परळच्या दामोदर हॉलच्या अंगणात अडकलेल्या या मालवणी जत्रोत्सवाला नंतर इतके पेव फुटले की, मुंबईच्या प्रत्येक गल्लीबोळात ही जत्रा भरू लागली आणि दशावतारी नाटकातील संकासुराचा आवाज मुंबईत घुमू लागला. त्यानंतर जवळपास दोन दशकांनंतर या जत्रेतूनच जन्म झाला तो कोकण महोत्सव व ग्लोबल कोकणचा. प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरापासून बी.के.सी., गोरेगाव ते नवी मुंबईपर्यंत अशा सर्वच ठिकाणी वातानुकूलित मंडपात कोकणचे महोत्सव रंगू लागले. मोठमोठे प्रायोजक, मोठमोठाले व्यासपीठ आणि त्यावर दिग्गज आणि वजनदार असे राजकीय नेते, शासकीय अधिकारी यांच्यामुळे कोकणच्या अशा महोत्सवाला रंगत आणली खरी, पण यातून कोकणाला आणि कोकणच्या तरुणांना काय मिळाले, हा प्रश्न आजही अनुत्तरितच आहे. कोकणचे नाव वापरून महोत्सवाच्या आयोजकांनी कोंबडा नाचविणे, बैलगाडी फिरविणे, दशावतारी नाटके करणे यांसारख्या मनोरंजनापलीकडे काहीच केले नाही.

वास्तविक याच साऱ्या गोष्टीला कंटाळून रोजगारासाठी कोकणची जनता जागतिक समजल्या जाणाऱ्या या मुंबई शहरात आली, म्हणूनच त्यांना व्यवसाय करून उद्योजक कसे बनता येईल त्यासाठी काय करायला हवे, कोकणातील जमिनीचा व्यवसायासाठी कसा वापर करता येईल, शासकीय योजना कोणत्या आहेत, अनुदान कसे मिळेल, बँकांचे कर्ज कसे उपलब्ध होईल आणि या सर्व गोष्टींची माहिती आणि मार्गदर्शन वर्षभर कुठे मिळेल याचे आयोजन महोत्सवाचे आयोजन करणाऱ्यांनी कधीच केले नाही. आयोजकांनी महोत्सवाच्या ठिकाणी वारेमाप स्टॉल कसे उभे राहतील आणि प्रायोजक अधिकाधिक कसे मिळतील हेच पाहिले. यामुळे अशा महोत्सवातून कोकणच्या नवउद्योजक तरुणांना तसे काहीच मिळाले नाही. खाजा, खडखडे लाडू, कोकम सरबत व मसाला यातच तो अडकला गेला. यातून त्याला बाहेर पडताच आले नाही व स्वतःला ग्लोबल म्हणवून घेणाऱ्यांनी या उद्योजकांना ग्लोबल उद्योजक बनविलेच नाही. यातच कोकणची एक पिढी संपली. यातून त्यांना कोणीच बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला नाही, पण आज मुंबईतील कोकणच्या तिसऱ्या पिढीतील उच्चशिक्षित तरुण कोकणात जाण्याच्या तयारीला लागला आहे. कारण कोकण हे महाराष्ट्रातील प्रचंड मोठे असे व्यवसायाचे केंद्र बनणार आहे याची या तरुणाला पूर्णपणे खात्री झाली आहे.

आज कोकणचे चित्र बदलू लागले आहे. अविकसित असलेल्या कोकणचा विकास वेगाने होत आहे. यामुळेच दुर्लक्षित असलेल्या कोकणाकडे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर साऱ्या देशाचे लक्ष वेधले गेले आहे. अल्पावधीतच कोकणचा महामार्ग चार पदरी होईल, कोकण रेल्वे दुपदरी होईल, कोकण रेल्वेच्या मार्गाला, कराड-चिपळूण आणि कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग जोडला जाणार आहे आणि मार्गाचे विद्युतीकरणही पूर्ण होईल. चिपीचा विमानतळ पूर्णत्वाच्या दिशेने आहे. तेथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमाने उतरण्यास सुरुवात होतील. जलवाहतूक सुरू होईल. मालवण तेंडोली येथे ‘सी वर्ल्ड’ उभे राहणार. या ‘सी वर्ल्ड’साठी गोवा-मालवण मेट्रो धावणार. हे सारे पूर्ण होईल त्या वेळी चारही बाजूंनी पर्यटक कोकणचे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी येतील, आणि परप्रांतीय व्यवसाय करण्यासाठी घुसतील. येणाऱ्या या देश-विदेशातील पर्यटकांसाठी पंचतारांकित हॉटेल्स उभी राहतील. हे सारे चित्र आज कागदावर आहे म्हणून कोकणी माणसाने हसण्यावर नेऊ नये. कारण हे सारे चित्र प्रत्यक्षात कोकणात लवकरच उतरेल त्या वेळी या कोकणात शिरायला नव्हे तर उभे राहायलाही जागा नसेल. कारण कोकणने विकासाच्या दिशेने वेगाने झेप घेण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत मराठी, कोकणी माणसाची जी अवस्था झाली ती होता कामा नये. मुंबईचा विकास आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे. उंचच उंच इमारती, चारही बाजूने मेट्रोचे जाळे, प्रत्येकाच्या घरी गाडय़ा, 2 बीएचके फ्लॅट; पण मुंबईच्या या विकासात कोकणचा माणूस आहे कुठे? भांडुपच्या की मालाडच्या आप्पापाडय़ाच्या डोंगरावर? 60-70 वर्षांपूर्वी प्रचंड संख्येने मुंबईत आलेल्या कोकणी माणसाच्या पहिल्या पिढीने सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करण्यापलीकडे काहीच केले नाही. आज मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाचे मूळ संस्थापक पहा कोकणचाच माणूस असेल. त्या भोळय़ाभाबडय़ा कोकणी माणसाला मुंबईचा एवढा विकास होईल याची जाणीवच नव्हती. म्हणूनच तो पिछाडीवर राहिला. दुसऱ्यांसाठी लढत राहिला. कोकणच्या बाबतीत असे होता कामा नये. विकास म्हणजे काय आणि या विकासातून काय निर्माण होऊ शकते याची जाणीव कोकणच्या प्रत्येक शिक्षित तरुणाला आहे. म्हणूनच कोकणच्या विकासाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यासाठीच मुंबईतील कोकणच्या तरुणांने गावाकडे कूच करायला हवे. वेळ पडल्यास हातातील नोकरी सोडून गावी व्यवसायात उतरायला हवे आणि म्हणूनच उद्योजक होऊ पाहणाऱ्या कोकणच्या तरुणांना मार्गदर्शक ठरेल अशी महापरिषद ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ने आयोजित केली आहे. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या भक्कम पाठबळाने ही महापरिषद होत आहे. या महापरिषदेत देशातील उद्योजक, टूर ऑपरेटर्स, गुंतवणूकदार, उद्योग विश्वातील आंतरराष्ट्रीय तज्ञ, होस्टेड बायर यांची उपस्थिती नक्कीच लाभदायी ठरणार आहे. फक्त कोकण विभागाला केंद्रस्थानी ठेवून प्रदर्शन, चर्चासत्रे आणि कार्यशाळा इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणातील पर्यटन, शेती, अन्न प्रक्रिया, इफ्रास्ट्रक्चर आणि रियल इस्टेट या व्यवसायातील संधी ‘कॉन्क्लेव्ह’च्या माध्यमातून कोकणातील उद्योजकांसमोर सादर करण्यात येणार आहेत. भव्य प्रमाणात होणाऱ्या या महापरिषदेत 600 हून अधिक व्यावसायिक प्रतिनिधी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा सहभाग असणार. 50 हून अधिक प्रदर्शने, 50 हून अधिक होस्टेड बायर्स, 50 हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय वक्ते आणि एका खास कॉफी टेबल बुकचे प्रकाशन असे सारे काही भरगच्च असणार. उद्योजक होऊ पाहणाऱ्या कोकणातील नवतरुणांना ही सुवर्णसंधीच उपलब्ध झाली आहे.

अधिक माहितीसाठी konkan conclave.com  ही वेबसाईट पाहता येईल.