मुंबईच्या गर्दीत ‘बेस्ट’ हरवली

प्रातिनिधिक फोटो

>>सुरेंद्र मुळीक<<

[email protected]

१९९७ साली सुवर्ण महोत्सव साजरा करणारी ‘बेस्ट’ हिरक महोत्सवी वर्षात पोहोचण्यापूर्वीच ढासळली. वेगाने विकासाकडे झेपावलेल्या मुंबईतील तरुणांची मानसिकता ओळखण्यास बेस्ट प्रशासन कुठेतरी कमी पडले आणि त्यामुळेच मागील बारा वर्षांत बेस्टचे तब्बल १३ लाख प्रवासी कमी झालेत. एकीकडे मुंबईची लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे तर दुसरीकडे बेस्टची प्रवासी संख्या तेवढय़ाच वेगाने कमी होत आहे. ही ‘बेस्ट’च्या दृष्टीने गंभीर घटना आहे.

‘बेस्ट’ वाचविण्यासाठी सोमवारी दादरच्या कोतवाल उद्यानापासून बेस्टच्या वडाळा आगरापर्यंत एक मोर्चा काढण्यात आला होता. मुंबईकरांचे नाव पुढे करून काढण्यात आलेल्या या मोर्चात प्रत्यक्ष मुंबईकर किती होते आणि बेस्ट संबंधित संघटनांची माणसे किती होती, हा मोठा प्रश्न आहे. मुळात बेस्ट वाचविण्यासाठी खरोखरच मुंबईकर रस्त्यावर उतरले असते तर सारी मुंबईच ठप्प झाली असती. पण तसे काही झालेले दिसले नाही. याचाच अर्थ मुंबईकर रस्त्यावर उतरले नाहीत आणि बेस्ट जिवंत राहावी यासाठी तर मुंबईकर अजिबात उतरणार नाहीत. कारण मुंबईकरांचा बेस्ट वरील विश्वास कधीच उडाला आहे. हे बेस्टने प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला विचारावे, ते एकच सांगतील ‘बस कधी येणार त्याचा भरवसा नाही.’ येथेच ‘बेस्ट’ने प्रवाशांची विश्वासार्हता गमावली आहे. याचे एकमेव कारण म्हणजे नियोजनशून्य कारभार हाकणारे प्रशासन आणि बेफिकिरीने वागणारा ‘बेस्ट’चा ऑपरेटिंग कर्मचारी. यामुळेच ‘बेस्ट’सारख्या एका चांगल्या योजनेचा बट्टय़ाबोळ झाला.

५० वर्षे पूर्ण झालीत म्हणून १९९७ साली थाटात सुवर्ण महोत्सव साजरा करणारी ‘बेस्ट’ हीरक महोत्सवी ७५ व्या वर्षांत पोहोचण्यापूर्वीच पूर्णतः ढासळली आहे. कदाचित वयोमानामुळे मुंबईचा वाटाडय़ा थकला असावा किंवा मुंबईतील वाढत्या प्रदूषणामुळे अस्थमाचा त्रास झाला असावा म्हणूनच अखेरची घरघर लागलेल्या ‘बेस्ट’ला आता वेगवेगळय़ा डॉक्टरांद्वारे सलाईन देण्याचा प्रशासन वारंवार प्रयत्न करीत आहे. पण त्यातून ‘बेस्ट’च्या प्रकृतीत सुधारणा होणे आज तरी शक्य वाटत नाही. कारण ही प्रवाशांच्या सलाईनवर जगते व प्रवाशांनी बेस्टला सलाईन देण्यास चक्क नकार दिला आहे. मागील दहा वर्षांतील बसच्या प्रवासी संख्येवरून हे स्पष्ट दिसत आहे. २००५-०६ साली ‘बेस्ट’ बसमधून सरासरी ४१ लाख ३८ हजार प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या आज २०१६-१७ मध्ये २८ लाख ३६ हजार झाली आहे. म्हणजेच तब्बल १३ लाख ४ हजार प्रवाशांनी बेस्टच्या बसमधून प्रवास करण्यास चक्क नकार दिला आहे. वास्तविक २००१ साली मुंबईची लोकसंख्या १ कोटी १९ लाख १७ हजार होती ती २०११साली १ कोटी २४ लाख ४२ हजार झाली व आज ती सुमारे १ कोटी ३० लाखांवर पोहोचली आहे. मात्र दुसरीकडे बेस्टची प्रवासी संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. याचाच अर्थ नव्या दमाच्या संगणक युगातील तरुणांनी बेस्टच्या सेवेला नकार दिला आहे. याला सर्वस्वी जबाबदार कारभार हाकलणारे प्रशासन आहे असेच म्हणावे लागेल. कारण मुंबईकरांना काय हवे हे ओळखण्यास प्रशासन कमी पडले.

जुलै २००५ मध्ये मुंबईत मुसळधार पडलेल्या पावसामुळे मुंबईत महाभयंकर पूर आला. संपूर्ण मुंबई पाण्याखाली बुडाली चार दिवस सर्व व्यवहार ठप्प झाले. कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले. पण यातूनही मुंबई पुन्हा सावरली. पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये म्हणून महापालिका आणि राज्य शासनाने अनेक योजना मुंबईत राबवल्या आणि मुंबईने हळूहळू आपली कूस बदलली. रस्ते रुंद झाले, उड्डाणपूल उभे राहिलेत. मोठमोठय़ा इमारती, टॉवर उभे राहिले. पुढील २५ वर्षांत शक्य होणार नाही ते मुंबईत १०वर्षांत झाले आणि मुंबईच्या घरांनी किमतीचा उच्चांक गाठला. मुंबईत आलेल्या कॉर्पोरेट ऑफिसेस गलेलठ्ठ पगार दिला आणि गलेलठ्ठ पगारवाल्यांची मुंबई ओळखू जाऊ लागली. हा सारा बदल १० वर्षांत झाला. पण… पण बेस्टच्या बसेसने आपल्यात सुधारणा केल्याच नाहीत. २१ व्या शतकातील १७ वर्षे उलटली तरीही बेस्टचा कंडक्टर प्रवाशांच्या वरून-खालून हात घालून रश्शी ओढून घंटी वाजवितो आणि ‘पिछे बस खाली है!’ असे सांगून बस पळवीत असतो. कधी रिकामी तर कधी भरलेली. कधी तासा-अर्धा तासांच्या अंतराने तर कधी पाठोपाठ एकाच नंबरच्या तीन-चार बसेस रिकाम्या असेच काहीसे बेस्टचे चित्र मी ५० वर्षे पाहत आहे. मी ज्यावेळी स्वतंत्रपणे बसने प्रवासास सुरुवात केली त्यावेळी कमीत कमी तिकीट १० पैसे होते. आज ते आठ रुपये झाले पण सुधारणा एका पैशाची झाली नाही. कंडक्टर, ड्रायव्हरचा तोच मळखाऊ गणवेश, तीच पैशाची बॅग, तीच रश्शी, तीच घंटी, सुट्टय़ा पैशाचा तोच वाद, बस स्टॉपवर न थांबविण्याची तीच पद्धत, सरळ उत्तर न देण्याची कर्मचाऱ्यांची तीच सवय सारे काही तेच. बदल झाला तो इतकाच ड्रायव्हर आणि कंडक्टरच्या डोक्यावरची टोपी गेली आणि ईव्हीएम मशीनद्वारे तिकीट. ही झाली अंतर्गत सुधारणा. पण त्या व्यतिरिक्त बेस्टने आपल्या मार्गिकांमध्ये कधी सुधारणा केली का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

वेगाने धावणाऱ्या मुंबईत माणसेही वेगाने धावत असतात. घडय़ाळाच्या काटय़ापेक्षाही मुंबईकर वेगाने धावत असतो आणि बेस्टची बस सरळ न धावता वेडीवाकडी धावून मुंबईचे दर्शन घडवीत असते. वास्तविक महाराष्ट्र पर्यटक विकास मंडळाची मुंबई दर्शन ही सोय असताना बेस्ट ही जबाबदारी का घेते, हे न सुटणारे कोडे आहे. आज वेगवान मुंबईसाठी जागोजागी उड्डाणपूल झाले आहेत. पूर्व-पश्चिम जोडणारे जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, सांताक्रुझ – चेंबूर लिंक रोड निर्माण झाले आहेत. पण बेस्टच्या बसेस जवळचा मार्ग अवलंबत नाहीत. पश्चिम उपनगरातील प्रवाशांना नवी मुंबई, नेरुळ, वाशी, चेंबूर, घाटकोपर अशा ठिकाणी जलद जाण्यासाठी सांताक्रुझ – चेंबूर लिंक रोड अत्यंत सोयीचा आहे. पण या मार्गावरून बेस्टची एकही बस जात नाही. कारण बेस्टला नेहमी वळसा घेऊन जाण्यातच आनंद असतो. बेस्टची ही जुनी मानसिकता आहे कारण ती स्वतःला मुंबईचा वाटाडय़ा समजते. बेस्ट प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या डोक्यातील हाच किडा काढण्याची गरज आहे. वेगाने धावणाऱ्या मुंबईतील प्रत्येकाला नियोजितस्थळी वेगाने पोहोचायचे आहे. बेस्टच्या बसेस यासाठी असमर्थ ठरल्या म्हणूनच तरुणांनी बेस्टला नाकारले आणि वेगाने पळणाऱ्या ‘ओला’, ‘उबेर’, ‘काळी-पिवळी टॅक्सी’ आणि ‘मोनो’ व ‘मेट्रो’ रेल्वेचा आधार घेतला. येथेच बेस्ट सेवा ढासळली. या तरुणांच्या म्हणण्यानुसार कामावर जाण्यासाठी बेस्टची बस पकडली तर सायंकाळी काम सुटताना ती पोहोचवेल! ही सध्या बेस्टची प्रतिमा आहे. ही प्रतिमा सुधारण्याची वेळ आली आहे पण ती सुधारायची कोणी असा प्रश्न आहेच, कारण बेस्टच्या प्रशासनाकडून ते शक्य नाही, तशी अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल.

 मागील पाच वर्षांपासून मुंबईतील प्रवाशांना मेट्रो, मोनोबरोबरच ओला, उबेर या खासगी परिवहन सेवाही उपलब्ध झाल्या. वेगाने आपल्या नियोजित स्थळावर पोहोचविणाऱ्या या सेवा असल्याने मुंबईकरांनी त्यांना अधिक पसंती दिली. पाच वर्षांपूर्वीच ही धोक्याची घंटी ‘बेस्ट’ आगारात वाजली होती. पण प्रशासनाने ऐकून न ऐकल्यासारखे केल्यानेच ही परिस्थिती निर्माण झाली. आणखी वर्षभरात मेट्रोचा दहिसर-अंधेरी व बोरिवली-डी. एन. नगर मार्ग सुरू होताच ‘बेस्ट’समोर अस्मानी संकट उभे राहिल.

स्वतंत्र प्राधिकरणाची आवश्यकता

केवळ मुंबईतील बेस्टचीच नव्हे तर ठाणे, पालघर जिल्हय़ांतील अनेक परिवहन सेवेची हीच अवस्था आहेत. प्रवासी वाट पाहतात एकीकडे तर बस फिरतात दुसरीकडे असेच काहीसे चित्र आहे. त्यामुळेच या सर्व परिवहन सेवा तोटय़ात आहेत. एम. एम. आर. डी.ए.च्या क्षेत्रात असलेल्या या सर्व परिवहन सेवेचे स्वतंत्र असे एक प्राधिकरण निर्माण होणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे मुंबई उपनगरीय रेल्वेच्या सुधारणेसाठी (MRVC) ‘मुंबई रेल्वे विकास कार्पोरेशन’ची निर्मिती झाली त्यानंतरच उपनगरीय रेल्वेत सुधारणा झाली त्याच पद्धतीने स्वतंत्र परिवहन प्राधिकरणाची आवश्यकता निर्माण झाली आहे.