मुद्दा :  वृद्धाश्रमऐवजी ज्येष्ठालय म्हणा!

>> सुरेंद्र तेलंग  

आज  एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास झाला आहे. विभक्त कुटुंब पद्धत अस्तित्वात आली आहे. जागेची टंचाई, भावाभावामध्ये वाद, सासू-सुनेचे न पटणे आदी कारणांमुळे विभक्त कुटुंब पद्धती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे वृद्ध आईवडिलांना कोणी  सांभाळायचं हा प्रश्न निर्माण झाला आहे. नवरा-बायको नोकरी करतात. त्यामुळे ही समस्या निर्माण होते. या कारणांमुळे आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवले जाते. वास्तविक वृद्धाश्रम हा शब्दच चुकीचा आहे असे मला वाटते. अनेक सामाजिक संस्था व सरकारकडून वृद्धाश्रम चालविली जातात. खरे तर त्याला वृद्धाश्रम शब्द वापरणे गैर आहे. त्याला ज्येष्ठालय असे नाव दिले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यातील ज्येष्ठपणाचा सन्मान होईल. ही भावना वाढीस लागली पाहिजे.

वृद्ध शब्दातून त्यांच्याविषयीचा टाकाऊपणाच दिसून येतो. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून कुटुंब आणि समाजातील मानसिकता बदलता येऊ शकते. त्यामुळे आता वृद्ध हा शब्द बाद केला पाहिजे आणि ज्येष्ठ हा शब्द वापरात आणला पाहिजे. कारण वयाने व अनुभवाने ही मंडळी ज्येष्ठ असतात. असा संस्कार दृढमूल होणे काळाची गरज आहे. भविष्यकाळात ज्येष्ठांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या विषयीचा सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागला पाहिजे. ज्याप्रमाणे मंत्रालय, औषधालय, वाचनालय, देवालय, शिवालय, दुग्धालय, विद्यालय, महाविद्यालय असे शब्द वापरले जातात, त्याचप्रमाणे वृद्धाश्रमऐवजी ज्येष्ठालय हा शब्द वापरला पाहिजे. अलीकडे अपंग या शब्दाऐवजी दिव्यांग हा शब्द प्रचारात आणला जात आहे. त्यामुळे या शब्दातून अपंगांकडे बघण्याची दृष्टी बदलत चालली आहे. त्यामुळे वृद्ध हा शब्द बाद केला पाहिजे. शासनाने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.