ठसा : कुलगुरू डॉ. अशोक ढवण


>>सुरेश जंपनगिरे<<

१९७४ साली एका हातात केवळ बॅग घेऊन मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारात पदवीसाठी प्रवेश करणारा एका खेडेगावातला गरीब विद्यार्थी आज त्याच विद्यापीठाच्या सर्वोच्च पदावर म्हणजे कुलगुरूपदावर विराजमान झाला आहे. ३१ मे २०१८ रोजी डॉ. अशोक श्रीरंगराव ढवण यांची वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाली. याच विद्यापीठामध्ये विद्यार्थी आणि त्यानंतर विविध पदांवर एकूण ३३ वर्षे विनातक्रार काम केले व हा भूमिपुत्र कुलगुरू झाला. विशेष म्हणजे विद्यापीठाची परिस्थिती पाहता, या विद्यापीठाच्या कुलगुरूपदावर भूमिपुत्राला नियुक्ती द्यावी, अशी जुनी परंतु आग्रही मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. ७ मे १९५७ रोजी औसा तालुक्यातील उजनी (जि. लातूर) येथे डॉ. ढवण यांचा जन्म झाला. अत्यंत हलाखीच्या स्थितीत त्यांचे बालपण गेले. कुलगुरूपदाच्या नियुक्तीपूर्वी ते जालना जिह्यातील बदनापूर येथील कृषी महाविद्यालयात सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य या पदावर होते. त्यांची कृषी पदवी प्रथमश्रेणीत १९७८ साली याच विद्यापीठात पूर्ण झाली. त्यानंतर १९८० साली भारतीय कृषी अनुसंधान संस्थान दिल्ली येथे एम.एस्सी. कृषी हे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. १९८४ साली दिल्ली येथेच त्यांनी मृद विज्ञान या विषयात पीएच.डी. केली. यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. मराठवाडा कृषी विद्यापीठात मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र्ा विभागाच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली. लातूर, धाराशीव येथील कृषी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पदाचाही त्यांनी कारभार पाहिला. त्यानंतर विस्तार शिक्षण संचालक आणि शिक्षण संचालक ही पदेसुद्धा याच विद्यापीठात त्यांनी यशस्वीपणे सांभाळली.  आंतरराष्ट्रीय स्तरावरसुद्धा त्यांची कामगिरी मोलाची ठरते. ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटी, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, अमेरिका येथे एफ.ए.ओ. फेलो म्हणून १९९५-९६ मध्ये ओरेगॉन व वॉशिंग्टन विविध विद्यापीठे व संशोधन संस्थेमध्ये त्यांना काम करण्याचा चांगला अनुभव आहे. जागतिक बँकेचे अर्थसहाय्य लाभलेल्या राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान या प्रकल्पाचे विद्यापीठाचे शीर्षस्थ अधिकारी म्हणून त्यांचे कार्य कौतुकास पात्र ठरले. शासन, खासगी उद्योग, केंद्र सरकार तसेच जागतिक बँकेच्या माध्यमातून अर्थसहाय्य प्राप्त झालेले एकूण ४५ संशोधन प्रकल्प त्यांनी हाताळले आहेत. केंद्र शासनाच्या जैव तंत्रज्ञान विभाग दिल्ली यांच्या अर्थसहाय्याने महिला शेतकऱयांसाठी गांडूळ खत निर्मिती तंत्रज्ञान प्रशिक्षण प्रकल्प त्यांनी राबविला. त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन पत्रिकामधून ५० पेक्षा अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झाले. राज्यस्तरीय, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील विज्ञानविषयक परिषदा, सेमिनार, कार्यशाळा आदीमध्ये सहभागी होऊन ७५ पेक्षा अधिक वेळा संशोधनपर निष्कर्षाचे सादरीकरण डॉ. ढवण यांनी केले आहे. प्रमुख संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांनी ५० हून अधिक विद्यार्थ्यांच्या संशोधन सल्लागार मंडळावर सदस्य म्हणून कार्य केले आहे. डॉ. अशोक ढवण यांनी त्यांच्या कार्यकाळात उल्लेखनीय कार्य बजावले आहे. सर्व घटक महाविद्यालयांमध्ये व्याख्यानगृह, प्रयोगशाळा, त्यांचे अद्ययावतीकरण करणे, प्रक्षेत्र विकास व पदव्युत्तर विद्यार्थी संशोधन प्रक्षेत्राचे अद्ययावतीकरण करणे, विद्यार्थीकेंद्रित व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचे आयोजन करणे, अनुभवातून शिक्षण उपक्रमांतर्गत सुविधा उभारणे व बळकटीकरण करणे, प्राध्यापकांसाठी विविध विद्यापीठांच्या माध्यमातून प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रम घेणे, स्वच्छ भारत अभियानाचे यशस्वी आयोजन, सर्वच घटक व संलग्न महाविद्यालयांत विद्यार्थी-प्राध्यापकांच्या सहभागातून मोठय़ा प्रमाणात वृक्ष लागवड करणे, संलग्न महाविद्यालयांत शैक्षणिक उपक्रमाचे मूल्यमापन व अद्ययावतीकरण करणे असे त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य ठरले. या शिवाय कृषी दैनंदिनी २०१३ व २०१४ तसेच ‘शेती-भाती’ या मासिकाचे ते मुख्य संपादक राहिले. विस्तार शिक्षण संचालक म्हणून काम करत असताना त्यांनी जिल्हा मासिक कार्यशाळा ८८, प्रशिक्षणवर्ग २६०, प्रक्षेत्र भेटी ७२०, चर्चासत्रे ५०० आणि ‘विद्यापीठ आपल्या दारी, तंत्रज्ञान शेतावरी’ हा नावीन्यपूर्ण विस्तार कार्यक्रम मराठवाडय़ाच्या सर्व जिह्यांमध्ये राबविला.  लातूर, धाराशीव जिह्यांतील गाळमुक्त धरण ही मोहीम राबवून तळ्यातील गाळ काढून हलक्या जमिनीची पुनर्रचना करण्याचे तंत्रज्ञान विकसित केले. डॉ. ढवण यांना राष्ट्रीय संशोधन कार्याबद्दल विशेष जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. डॉ. ढवण यांचा कुलगुरूपदाचा कार्यकाळ कृषी विद्यापीठात होणारे नवनवीन संशोधन, संशोधक विद्यार्थी अभ्यासक आणि प्राध्यापकास मार्गदर्शक ठरेल यात शंकाच नाही.