घरातील सात्त्विकता लेखणीत उतरली


अनुराधा राजाध्यक्ष, [email protected]

लेखक, नाटककार सुरेश खरे… स्वतःभोवतीचे अस्सल मध्यमवर्गीय संस्कार जोपासत त्यांच्या लेखणीने प्रदीर्घ प्रवास केलाय….

‘घर म्हणजे चार भिंती नाहीत. जेव्हा चार बिऱहाडांच्या भिंती मोडून प्रसंगी सगळे एक होतात ते घर. गिरगावातल्या केळेवाडीतल्या सोमण चाळीतल्या दोन खोल्यांत आई-वडील, भाऊ-बहीण यांच्यासोबत 33 वर्ष राहिलो, तेव्हा मजल्यावरच्या इतर चार बिऱहाडांचं मिळून आणि आता स्टेला मारीस बिल्डिंगमध्ये जातीपातीच्या भिंती तोडत, वीस बिऱहाडं मिळून माझं एक घर आहे. म्हणूनच माझ्या मुंजीत आमचे पाहुणे सोमण चाळीतल्या इतर बिऱहाडांत आपलंच घर समजून राहिले होते आणि सगळ्यांची मिळून एकच चूल आमच्या घरी पेटली होती. घरांच्या बाबतीत मी नशीबवान आहे तो हा असा.’ नाटक, चित्रपट, चित्रफिती, स्तंभलेखन या माध्यमांवर स्वतःचा ठसा उमटवत लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा भूमिका मनापासून जगत, सृजनाचं अर्ध्य आयुष्याला वाहत, 25 जानेवारीला 81 वर्षांचे होणारे सुरेश खरे सांगत होते त्यांची घराबद्दलची संकल्पना. त्यांच्या घरी गेले तेव्हा माझी शूटिंगच्या सामानाची बॅग घेण्यासाठी त्यांनी पटकन हात पुढे केला. मी अर्थातच नम्रपणे हसत नकार दिला. पण वयानं, अनुभवानं आणि मानानं इतका मोठा असणारा हा माणूस आपलं माणूसपण सगळ्या मानसन्मानाच्या पलीकडे जाऊन जपतो आहे याचा अनुभव सुखावणारा ठरला. सुरेशदादा मग बसले सोफ्यावरच्या त्यांच्या नेहमीच्या आवडत्या जागी आणि सांगत राहिले आयुष्यातल्या कितीतरी आठवणी.

‘गिरगावातल्या त्या घरानं मला खूप काही दिलं. जे आयुष्यभर पुरलं. ते सुशिक्षित, सुसंस्कृत वातावरण. मनाचे श्लोक, अथर्वशीर्ष, गीता पठण. आई गृहिणी. वडील शिक्षक. आईला वाचनाची आवड. गोखरकर लायब्ररीची ती मेंबर. शाळेतल्या वयातच माडखोलकर, खांडेकर, फडके वाचून संपवले होते मी. काय वाचतोय हे समजायची कुवत नव्हती तरीही. त्यामुळे निबंध छान व्हायचे. वर्गात वाचून दाखवले जायचे. दहा वर्षांचा असताना ‘सत्तेचा गुलाम’मध्ये मी स्त्री भूमिका केली आणि नाटकाची इंगळी मला डसली. कळलं, असं काही केलं की कौतुक होतं. म्हणूनच मोठेपणी नट व्हायचं मी ठरवलं. पण नंतर अभिनयापेक्षा लेखनात गती असल्याचं जाणवलं. कॉलेजात असताना काही कविता केल्या. ज्या ‘विविध वृत्त’, ‘आलमगीर’मध्ये छापून आल्या आणि ‘सत्यकथे’तून साभार परतही आल्या. व्हॉईसरॉय ऑफ इंडिया रेस्टॉरंटमध्ये मित्रांबरोबर जायचो नेहमी. तेथे बबन प्रभू यायचे. त्यांच्या वाचनात माझी एक कथा आली. ती संवाद रूपातच होती लिहिलेली. आठ दिवसांत त्यांनी नभोनाटय़ स्वरूपात आकाशवाणीवरून ती प्रसारित केली. तेव्हा जाणवलं, जमतंय की आपल्याला लिहायला… आणि मग लिखाणाचा अखंड प्रवास सुरू झाला. गिरगावातल्या त्या घरात टेबल-खुर्ची नव्हती. म्हणून मांडीवर बोर्ड घेऊन, पलंगावर बसून लिहायचो. आजूबाजूला मुलं खेळत असायची. रेडिओवर गाणी लागायची. पण शांततेचा भंग होतो आहे, असं कधी वाटलं नाही. हा आपल्या जीवनाचा भाग आहे आणि तो स्वीकारला पाहिजे, ही सहिष्णूता मला त्या चाळीनं शिकवली. मला लागायचे ते फक्त पांढरेशुभ्र कागद आणि शाईचं पेन. पहिल्या पाच नाटकांचा जन्म तिथेच झाला.’
लेखनाची ऊर्मी इतर अडथळ्यांवर कशी मात करते हे सांगताना सुरेशदादा म्हणाले, ‘बायकोला ताप होता. तिच्या डोक्यावर कोलन वॉटरच्या घडय़ा ठेवत सखी शेजारणीचा शेवटचा अंक मी लिहिला. विमा कंपनीत नोकरी करून लिखाण केलं. तेव्हा दोन कंपार्टमेंट केली होती डोक्यात. ऑफिसमध्ये दहा ते सहा नाटकवाल्यांचे फोन घ्यायचे नाहीत आणि सहानंतर ऑफिससंबंधित कामं नाहीत. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी सहा ते सकाळी सहा नाटकाचा विचार असायचा डोक्यात. लग्न होतानाच मी बायकोला तीन गोष्टी सांगितल्या होत्या. सहानंतर फिरायला येणं, भाजीबाजार करणं वगैरे मला जमणार नाही. मी आईशिवाय वेगळा राहू शकणार नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या अनेक मैत्रिणी आहेत. त्या मैत्रिणीच आहेत आणि राहतील. आनंदाची गोष्ट अशी की, 48 वर्षांच्या संसारात या गोष्टींवरून आमच्यात कधीही वादसुद्धा झालेला नाही.’

घराच्या बाबतीत सुखी माणसाचा सदरा घातलेले सुरेशदादा त्यांच्या नाटकाच्या लिखाणाची प्रक्रिया सांगताना पुढे म्हणाले, ‘मी विषयांच्या मागे जात नाही. विषय मला म्हणतात मला लिही, तेव्हा मी लिहितो. ऑफिसच्या व्यापात लिहायला वेळ कमी पडायचा म्हणून दर शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता टॅक्सी पकडून मी थेट पुण्याला श्रेयस हॉटेल, रूम नंबर 405 गाठायचो. तिथे रविवार संध्याकाळी सहापर्यंत एक ते दीड सीन लिहून व्हायचा.’

पूर्वी कागद-पेन घेऊन आणि आता संगणकावर लेखन करताना सुरेश दादांना, ज्ञानेश्वरीची एक छोटी प्रतिकृती मात्र समोर लागतेच. तिच्यामुळेच सुचलेली कल्पना एका बैठकीत पूर्ण होते ही त्यांची श्रद्धा. 464 पानांचं आत्मचरित्र त्यांनी स्वतः टाईप केल्याचं आवर्जून सांगितलं. सुरेश दादा म्हणाले, ‘कुणी सांगितलं म्हणून मी लिहीत नाही. मनातली लेखकाची घंटा वाजल्यावर मात्र लेखणी थांबत नाही. गरिबीमुळे आत्महत्येचा प्रयत्न आणि तीन मुलांचा खून करणाऱया एका स्त्रीच्या केसचा निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटलं होतं की, असे सामाजिक प्रश्न शिक्षा देऊन सुटत नाहीत. त्यामागच्या कारणांचा शोध घेतला पाहिजे. त्याच वाक्यानं ‘स्वर जुळता गीत तुटे’ हे माझं नाटक आकारलं. माझी शाळेतली मैत्रीण अनेक वर्षांनी मला भेटली. नंतर कळलं की सुसंस्कृत घराण्यातली ती गोड मुलगी कॉलगर्ल आहे. प्रश्न पडला का असं झालं असेल? ‘मला उत्तर हवंय’ त्यातूनच लिहिलं गेलं. घटना घडते तो माझ्या नाटकाचा शेवट असतो आणि ती का घडली, कशी घडली या प्रश्नांची उत्तरं म्हणजे नाटक असतं.’

लिखाणात लेखकाचा आयुष्याचा दृष्टिकोन उमटतो हे तर खरेच. स्त्री पुरुष संबंधाकडे कुठलंही लेबल न लावता निरोगी नजरेनं सुरेश दादा पाहू शकले. म्हणूनच ‘संकेत मिलनाचा’सारखं नाटक लिहू शकले. शरीरसंबंधांपासून सुरू झालेलं नातं, मैत्रीच्या आणि आई मुलाच्या नात्यालाही नंतर सामावताना त्यांनी दाखवलं. उघडी नागडी भाषा आणि प्रसंग टाळून सूचकतेनं प्रसंग उभारण्याची सुरेश दादांची संस्कारी लेखणी लोकांची नेहमीच दाद मिळवून गेली आणि अनेक पुरस्कारांनी सजली. सुरेश दादा आठवणींचा खजिना रिता करताना म्हणाले, नाटक लिहिताना माझ्या मनातल्या रंगमंचावर ते घडत असतं. मला लिहिताना हसू आलं तर प्रेक्षक हसतील आणि नायिकेच्या दुःखानं मी रडलो तर प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी येईल, याची मला जाणीव असते. नाटक लिहून झालं की, मनाच्या घरात जमलेली सगळी मंडळी आपापल्या घरी निघून जातात. लग्न मंडपात कन्यादान केल्यानंतरच्या बापासारखी माझी अवस्था होते. मग मी हळूच पुढच्या नाटकाकडे वळतो.’

बोलता बोलता सुरेशदादा क्षणभर थांबले. म्हणाले, ‘आपली पन्नास वर्ष मैत्री असल्यासारखं बोलतोय मी सगळं काही.’ मुलाखतीला औपचारिकतेचा स्पर्श नसल्याची पावतीच वाटली मला ती. त्यांना भेटायला गेले तेव्हा घसादुखीनं हैराण होते मी. प्यायला गरम पाणी करून द्यायला ते स्वतः स्वयंपाघरात गेले. मी म्हणाले, तुम्हाला कशाला त्रास? मी घेते करून गरम पाणी. तर म्हणाले, ‘त्रास कसला? सवय झाली आहे आता. 2015 मध्ये बायको गेली. तेव्हापासून घरातली काडी इकडची तिकडे न करणारा मी रोज रात्री स्वतः आमटी भात करून खातो. दुपारी स्वयंपाकी भाऊंनी केलेलं जेवण जेवून, भांडी विसळून मगच घासायला ठेवतो. ओटा धुतो आणि हे सगळं मनापासून करतो. कारण जे करायचं ते 100 टक्के आणि प्रेमानं, ही आई वडिलांची शिकवण आहे.’ परिस्थिती स्वीकारत ‘फरगेट ऍण्ड फरगिव्ह’ या न्यायानं जगत दुसऱयाला देता येईल तेवढा आनंद देत, स्वतः आनंदी रहाणाऱया सुरेश दादांना भेटणं म्हणजे आयुष्याला समजून घेऊन जगणं अनुभवणं होतं.