…तर पंतप्रधानांना काम करण्याची गरजच नाही!

अमित खोत । मालवण

अगदी गावपातळीवर होणाऱ्या निवडणुकांमुळे आपल्या देशात लोकशाही घट्ट रुजली आहे. गावातील सत्ता केंद्र मजबूत बनवण्यासाठी ग्रामपंचायतीना अधिक विकासनिधी देण्याचे धोरण शासनाने ठरवले आहे. या विकास निधीचा नियोजनबद्ध वापर करत गावागावात निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांनी ग्रामस्थांना अपेक्षित असे गाव विकासाचे धोरण अवलंबल्यास देशाच्या पंतप्रधानांना काम करण्याची गरजच पडणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी मालवण येथे बोलताना केले.

दरम्यान हिंदुस्थानला नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान मोदी हे देशाला एक नवी दिशा दाखविण्याचे काम करत असून आज जगातील अनेक देश मोदींबद्दल आदर व्यक्त करत आहेत. असेही कौतुकोद्वार प्रभू यांनी काढले.

कोकणच्या दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी मालवण येथे शनिवारी सायंकाळी मालवण तालुका भाजपा कार्यालयास भेट दिली. यावेळी प्रभू यांच्या हस्ते तालुक्यात निवडून आलेल्या भाजपच्या सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच दर्पण पुरस्कार जाहीर झालेल्या ज्येष्ठ पत्रकार राजा खंडाळेकर व नंदकिशोर महाजन यांचाही प्रभूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना सुरेश प्रभू म्हणाले, देशामध्ये लोकशाही टिकवून ठेवण्याचे काम गावातील निवडणूका करत आहेत. गावाचा विकास हा देशाच्या विकासाचा मूलभूत पाया आहे. गावातील लोकांच्या अपेक्षा या गावातील विकास कामे व्हावीत एवढीच असते. गाव पातळीवरील कामे होत नसल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा आमदार, खासदार व पंतप्रधानांवर येऊन ठेपतात. त्यामुळे गावस्तरावरील कामे व्यवस्थित करून मोदींच्या देश विकासाच्या संकल्पनेला साथ देण्याचे कार्य सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले पाहिजे. शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी भरघोस निधी दिला जात आहे त्याचा योग्य विनियोग झाला पाहिजे. गावपातळी वरील कामे व्यवस्थित झाली तरच जनतेचा लोकशाही वरील विश्वास वाढेल, असेही प्रभू म्हणाले.

(छाया- गणेश गावकर)
(छाया- गणेश गावकर)

यावेळी मालवण विषयी बोलताना सुरेश प्रभू म्हणाले, मालवण व मालवणी माणसाची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. बंदरे बंद झाल्यामुळे मालवणची ख्याती आज खालावली आहे. त्यामुळे मालवणी बाणा व अस्मिता कायम ठेवून मालवणला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्व मालवणवासीयांनी एकत्रित काम करणे महत्वाचे आहे, असेही ते म्हणाले.