मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपला दणका बसणार, काँग्रेस ‘कमबॅक’ करणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

कर्नाटकात सत्तेचे स्वप्न भंगलेल्या भाजपसाठी येत्या काही महिन्यांत आणखी मोठा झटका बसण्याची दाट शक्यता आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात ‘कमळ’ कोमेजणार आणि काँग्रेस ‘कमबॅक’ करेल असा अंदाज ‘एबीपी न्यूज’ आणि ‘सीएसडीएस लोकनीती’ यांनी केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात व्यक्त केला आहे. छत्तीसगडमध्येही भाजपसाठी बुरे दिन येतील असा अंदाज आहे.

२०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. तत्पूर्वी २०१८ च्या अखेरीस नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुका अत्यंत महत्त्वपूर्ण असून याचा थेट परिणाम २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवर होईल. भाजप आणि केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरुद्ध जनतेमध्ये नाराजी वाढत आहे.

– मध्य प्रदेशात सलग तीन टर्म भाजपची सत्ता आहे. शिवराजसिंह चौहान २००५पासून मुख्यमंत्री आहेत पण यावेळी मध्य प्रदेशात भाजपला मोठा झटका बसेल असा अंदाज सर्वेक्षणात मांडला आहे.
– यावेळी भाजपला केवळ ३४ टक्के मते मिळतील. गेल्या वेळी ४४.८८ टक्के मते होती. १० टक्के मतांचा फटका बसेल.
– गेल्या वेळी काँग्रेसला ३६.६८ टक्के मते मिळाली होती. यावेळी काँग्रेसच्या मतांमध्ये तब्बल १३ टक्क्यांनी वाढ होऊन तब्बल ४९ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.

राजस्थानात भाजपच्या मतांमध्ये मोठी घट
– राजस्थानात भाजपच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचे सरकार आहे, मात्र भाजपवर जनतेची नाराजी वाढत असल्याने विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.
– गेल्या निवडणुकीत भाजपला ४५.१७ टक्के मते मिळाली होती. यावेळी ही टक्केवारी ३९ टक्क्यांपर्यंत खाली घसरेल.
– काँग्रेसला फायदा होणार आहे. गेल्यावेळी काँग्रेसला ३३.७ टक्के मते होती. त्यात यावेळी १० टक्क्यांनी वाढ होऊन ४४ टक्के मते मिळतील असा अंदाज आहे.