सूर्यवंशम झाला 20 वर्षांचा!

176

सामना ऑनलाईन, मुंबई

सुट्टीचा दिवस असो किंवा मधला एखादा वार…चॅनेल सर्फिंग करताना सेट मॅक्सवर मध्येच बिग बी यांच्या सूर्यवंशम या सिनेमाची झलक पाहायला मिळते. अरे देवा, पुन्हा सूर्यवंशम सिनेमा लागला…अशा काहीशा नकळत प्रतिक्रीया प्रेक्षकांकडून येतात. बरेच दिवस हा सिनेमा सेट मॅक्सवर लागला नाही तर प्रेक्षकांनाही चुकल्यासारखे वाटते. अचानक या सिनेमाबद्दल भरभरून लिहिण्याचे कारण म्हणजे प्रेक्षकांचा लाडका सूर्यवंशम हा सिनेमा आता 20 वर्षांचा झाला आहे.

21 मे 1999 रोजी सूर्यवंशम हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर धडकला. त्यावेळी बॉक्स ऑफीसवर या सिनेमाला थंड प्रतिसाद मिळाला. मात्र 20 वर्षानंतरही या सिनेमाची चर्चा होईल अशी पुसटशी कल्पनाही त्यावेळी निर्मात्यांच्या, कलाकारांच्या मनात आली नसावी. आता 20 वर्षे पूर्ण होतायत म्हणजे या सिनेमाचे सेलिब्रेशनही तितकेच खास असणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 25 मे ला दुपारी 12 वाजता पुन्हा एकदा भानुप्रताप सिंह सेटमॅक्सवर तुमच्या भेटीला येतायत. मग बघताय ना ? बघायलाच पाहिजे.

सेटमॅक्सवरच सिनेमा का?

हा सिनेमा या वाहिनीवर वारंवार दाखवला जातो. याचे कारण म्हणजे हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काही वेळ आधीच ही वाहिनी लाँच झाली होती. त्यावेळी या वाहिनीने एक, दोन नव्हे तर तब्बल 100 वर्षांसाठी या सिनेमाचे राइट्स विकत घेतले होते. त्यामुळे हा सिनेमा सातत्याने येथे पाहायला मिळतो.

सूर्यवंशमबद्दल हे माहितेय का ?

  • कन्नड अभिनेत्री सौंदर्या हिचा पहिला आणि शेवटचा बॉलीवूड चित्रपट होता. हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे 17 एप्रिल 2004 मध्ये तिचा मृत्यू झाला होता.
  • या सिनेमातील जयसुधा आणि सौंदर्या या दोन्ही भूमिकांसाठी अभिनेत्री रेखा यांनी डबिंग केले.
  • हा सिनेमा तेलुगु दिग्दर्शक ई. व्ही. व्ही. सत्यनारायण यांचा बॉलिवूडमधील पदार्पणाचा सिनेमा होता.
  • यात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली होती. सुरूवातीला या सिनेमात बाप-मुलाच्या भूमिकेसाठी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांना विचारले होते.
आपली प्रतिक्रिया द्या