लेख : परदेशातील शिक्षणाची ‘दूर जाणारी वाट’

>>सुषमा एकनाथ मढवी

या चिमण्यांनो, परत फिरा रे…’ हा ‘सामना’च्या (27 मे) ‘उत्सव’ पुरवणीतील प्रतीक राजूरकरांनी लिहिलेला लेख वाचला आणि मलाही भूतकाळात डोकावंसं वाटलं.

7 ऑगस्ट 2007 मध्ये माझी मुलगी उन्नती एकनाथ मढवी ही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेली. तिथे ती ‘सीएनआयएम’ बनून आज सीनियर न्यूरोफिजिओलॉजिस्ट म्हणून चार वर्षे कार्यरत आहे. याचा आम्हाला अभिमान असला तरीही त्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट व संघर्षाची जाणीव परदेशात शिक्षण घ्यायची इच्छा असणाऱ्या सगळय़ांना व्हावी यासाठी हा लेखन प्रपंच.

आजच्या काळात शिक्षणाचे महत्त्व सगळय़ांनाच समजल्याने विद्यार्थी व पालक जागरुक झाले आहेत. मुले लहान वयातच आपले शैक्षणिक ध्येय निश्चित करतात. 10 वी, 12 वीपासूनच हुशार विद्यार्थी परदेशी शिक्षण घेण्यासाठी लागणारी तयारी सुरू करतात. खूप अभ्यास करून त्यासाठीच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन ऑगस्टची तारीख, युनिव्हर्सिटी, रँक आणि फी या सर्व प्रश्नांच्या उत्तरांची उतावीळपणे वाट बघतात आणि एक दिवस याही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात, पण खरे प्रश्न त्यांना समजलेलेच नाहीत. पालकांनी डोळय़ांत तेल घालून वाढवलेली ही मुले चांगले शिक्षण व चांगले संस्कार घेऊन, परदेशी लागणाऱ्या वस्तूंची नियमानुसार पूर्तता करून जेव्हा विमानतळावरून सर्व कुटुंबीयांना, मित्रांना टाटा-बाय बाय करत अश्रूभरल्या नजरेने मायभूमीचा निरोप घेतात तेव्हा विमानाबरोबरच मुलांनी शिक्षणासाठी घेतलेली उत्तुंग भरारी माता-पित्याच्या अभिमानाचा विषय ठरते.

पौगंडावस्थेतील विद्यार्थी परदेशात अनेकदा भांबावून-भारावून जातात. तिथली संस्कृती, स्वातंत्र्य यांच्याशी जुळवून घेत घरकाम करत करत शिक्षणाला सुरुवात करतात. त्यात त्यांची खूप धावपळ होते. जिवाची घालमेल होते. मुले होम सिक होतात. तरीही सर्व अडचणींवर मात करत रूममेट्सशी जुळवून घेत रॅगिंगचा सामना करत ते चांगला स्कोअर करतात. पहिल्या टर्मनंतर सुट्टीत जॉब करतात. अभ्यास बंद असल्याने मनसोक्त स्वातंत्र्य उपभोगतात आणि इथेच काही विद्यार्थी आपल्या ध्येयापासून नकळत दूर जातात. स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात होते. सावरायला, सांभाळायला, समजवायला जवळचे कोणी नसल्याने काही वेळा खोटे बोलणे, उधारी करणे, चोरी करणे असे प्रकार घडू लागतात, पण पालकांना यातलं काहीही सांगितले जात नाही. फक्त वारंवार वेगवेगळय़ा कारणांसाठी घरून पैशांची मागणी केली जाते. वर्षभरात परदेशी वातावरणाशी एकरूप झालेल्या आपल्या मुलांना हिंदुस्थानात यावेसे वाटत नाही. त्यांना वडीलधाऱ्यांचे उपदेश, धार्मिक वातावरणही शिक्षा वाटू लागते. सुरुवातीला होम सिक होणाऱ्या मुलांना आता पालकांना फोन करायलाही वेळ नसतो. ते त्यांच्या आयुष्यात मग्न असतात. ग्रॅज्युएट होतात. कॉन्व्होकेशनसाठी लाखो रुपये खर्च करून परदेशात गेलेल्या पालकांना आपली मुले शिक्षणासाठी दूर गेली आणि आपल्यापासून मनानेही दूर गेल्याचे तिथे गेल्यावर जाणवते. कारण त्यांच्यातील संवाद संपलेला असतो.

ग्रॅज्युएशननंतर मुले परत येतील असे पालकांना वाटते, पण ती मात्र मास्टर्ससाठी दोन वर्षे तिथेच राहतात. अर्न अँड लर्न करत मास्टर्स होतात. पालकांना खूपच आनंद होतो, पण तो क्षणिक असतो. कारण आता परदेशातील राहणीमान, स्वातंत्र्य, सुविधांना मुले इतकी सरावलेली असतात की, पुन्हा हिंदुस्थानात येण्याचा मार्ग त्यांनी स्वतःच बंद केलेला असतो. मायदेशापेक्षा कित्येक पटीने जास्त मिळणारा पगार मुलांना आई-वडिलांच्या प्रेमापेक्षा मोठा वाटतो आणि इथेच मुलांची व पालकांची कायमची ताटातूट होते.

आई-बाबांचे डोळे क्षीण होतात तरीही मुले मात्र परत हिंदुस्थानात येत नाहीत, पण प्रचंड पैसा मिळवत असल्याने आई-वडिलांच्या म्हातारपणासाठी पैशांची सोय मात्र करतात. हिंदुस्थानात यायला सुट्टी मिळत नाही या सबबीखाली माया, ममता, जिव्हाळा लपवून भावनाशून्य होतात. काही वेळा तर परदेशातील मुलांना आई-वडिलांचे जुने विचार, संस्कार, शिकवण, शिस्त यांची लाज वाटू लागते. म्हणून पालकांनो, आपल्या मुलांना परदेशी पाठवताना सावध करा. उच्च शिक्षण घेऊन ते परत येतील, आई-वडिलांशी असलेली नाळ तोडणार नाहीत याची काळजी घ्या.