धोनीवर मैदानात पुरस्कारांची बरसात, पण स्क्रीनवर दुष्काळ

मुंबई

‘एम.एस.धोणी – द अनटोल्ड’ स्टोरी या चित्रपटात हिंदुस्थानी क्रिकेट टिमचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याची भूमिका करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत याला त्याच्या भूमिकेसाठी एकही पुरस्कार न मिळाल्याने दुःखी झाला आहे. सुशांतने स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलताना ही गोष्ट मान्य केली आहे.

धोनीची भूमिका साकारण्यासाठी सुशांतने फिटनेस, क्रिकेटमधील एथिक्स पासून क्रिकेटच्या खेळापर्यंत सर्व गोष्टिसाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण इतके करुनही त्याच्या या भूमिकेला एकही पुरस्कार मिळालेला नाही. ‘मी खोटं बोलणार नाही पण पुरस्कार सोहळ्यात मी उपस्थित असताना मी एवढी मेहनत घेऊन साकारलेल्या भूमिकेला पुरस्कार न मिळाल्याने मला फार विचित्र वाटायचे. थोडासा दुःखीही व्हायचो पण प्रसारमाध्यमांकडून माझ्या कामाची दखल घेतली जातेय हे बघून बरही वाटायचे. पुरस्कार मिळाला काय आणि नाही मिळाला काय त्याचा माझ्या कामावर कधीच परिणाम होणार नाही.’ असे सुशांतने प्रसारमाध्यमांना सांगितले.

‘एम.एस.धोणी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटातून खेळाडूची भूमिका निभावल्यानंतर सुशांत लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांना खेळाडूच्या भूमिकेत दिसणार. आहे. यावेळेस सुशांत पॅरालिम्पिक पदक विजेता मुरलीकांत पेटकर यांचे किरदार मोठ्या पडद्यावर साकारणार आहे.