खुनासाठी गुन्हेगारांनाच पळवले, नगरसेविकेचा पती अटकेत

सामना प्रतिनिधी । पिंपरी

एका माजी नगरसेवकच्या खुनाची सुपारी दिल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचा पती अॅड. सुशील मंचरकर याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पिंपरी येथून अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, पुणे पोलिसांच्या कैदेतून फरार झालेल्या कैद्यांनाच मंचरकर यांनी सुपारी दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना पुणे पोलिसांच्या मुख्यालयाचे पोलीस सातारा, खंडाळा येथील न्यायालयात नेत होते. तेथून परत येत असताना हे गुन्हेगार पोलिसांना चकवा देऊन फरार झाले होते. त्यानंतर हे गुन्हेगार पिंपरी मोरवाडी येथील न्यायालयासमोरून पळून गेल्याचे स्पष्ट झाल्याने पिंपरीकडे गुन्हा तपासासाठी वर्ग केला. गुन्हे शाखा तपास करत असताना फरारी गुन्हेगार सापडले आणि त्यांच्याकडून ही धक्कादायक माहिती समोर आली.

पिंपरीतील येथील माजी नगरसेवक, तसेच नेहमीच मंचरकर यांच्याशी राजकीय वैमनस्य असणारे कैलास कदम यांच्या खुनाची सुपारी देण्यात आल्याचे या गुन्हेगारांनी माहिती दिली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंचरकर याला शुक्रवारी अटक करून न्यायालयात हजर केले आहे.