दाभोलकर हत्याप्रकरण, गोळ्या झाडणाऱ्याला 5 वर्षांनंतर अटक

सामना प्रतिनिधी, संभाजीनगर

अंधश्रद्धा निर्मूलनचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्याला 5 वर्षांनी अटक करण्यात आली आहे. संभाजीनगरातील सचिन अनदुरे या तरुणाने तशी कबुली दिल्याचा दावा एटीएस आणि सीबीआयने केला आहे. नालासोपारा स्फोटकप्रकरणी शरद कळसकर याला एटीएसने ताब्यात घेतले होते. त्याच्या चौकशीत अनदुरेचे नाव पुढे आले. यावेळी मीच दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या अशी कबुली अनदुरेने दिली, असे एटीएसचे म्हणणे आहे. त्याला आता सीबीआयच्या हवाली केले असून अधिक तपास सुरू आहे.

नालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसने संभाजीनगर कनेक्शन उघड केले होते. दौलताबादजवळील केसापुरी येथील शरद कळसकर व त्याच्या साथीदारांच्या बसैयेनगर आणि कैलासनगर भागातील घरांवर पोलिसांनी छापे मारले होते. 13 ऑगस्ट रोजी मुंबई आणि संभाजीनगर एटीएसने संभाजीपेठेतून सचिन प्रकाशराव अनदुरे (28) यास ताब्यात घेतले होते. पोलीस तपासात त्याने नरेंद्र दाभोलकर खूनप्रकरणी हात असल्याचे सांगितले.
मुंबई आणि संभाजीनगर एटीएसने संयुक्तिक कारवाई करत सचिन यास मंगळवारी दुपारी संभाजीपेठ परिसरातून ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या भावाला माहिती देत तपासासाठी मुंबईला नेले. सचिन अनदुरेचे आईवडिलांचे निधन झाले असून त्यास एक भाऊ आहे. सचिन हा राजाबाजार कुंवारफल्लीत रवी शिंदे याच्या घरात भाड्याने राहत असून तो निरालाबाजार येथील एका कापड दुकानात काम करत होता. सचिनचे लग्न झालेले असून त्यास पत्नी व एक मुलगा आहे.

नालासोपारा प्रकरणी अटकेत असलेला दौलताबाद येथील शरद कळसकर याचा साथीदार असून ते दोघे तीन वर्षे बसैयेनगरात खोली घेउैन भाडय़ाने राहत होते. दोघांचे संभाजीनगरातील छत्रपती महाविद्यालयात शिक्षण झालेले आहे. कर्नाटक एसआयटीने गौरी लंकेश खून प्रकरणाचा तपास सुरू केल्यावर त्यांनी अटक केलेल्या आरोपींचे घटनाक्रम नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणाशी जुळत असल्याने कर्नाटक पोलिसांनी मुंबई एटीएसला माहिती दिली होती. यावरून मुंबई आणि संभाजीनगर एटीएसने संयुक्तिक तपासाला सुरुवात केली असता त्यांना सचिन अनदुरेचे नाव समजले.

जालन्यातून आणखी एकाला अटक
जालना शहरातील अंबड चौफुली येथील श्रीकांत पांगरकर या तरुणालाही संभाजीनगर एटीएसच्या पथकाने उचलले आहे. सचिनने गोळय़ा झाडल्या, तर श्रीकांत हा गुन्ह्यात वापरलेले वाहन चालवत होता, असे एटीएसने म्हटले आहे.

दाभोलकर हत्याप्रकरण
डॉ. नरेंद्र दाभोलकर शनिवार पेठेत बालगंधर्व रंगमंदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून 20 ऑगस्ट 2013 रोजी सकाळी सात वाजून 20 मिनिटांनी जात असताना काळ्या स्प्लेंडरवरून आलेल्या 25 ते 30 वर्षे वयाच्या दोन तरुणांनी अचानक त्यांच्या दिशेने पाठीमागून चार गोळय़ा झाडल्या. त्यापैकी दोन गोळय़ा दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या आणि ते खाली कोसळले होते.