अखेर स्वाभिमानी सत्तेतून बाहेर, खासदार शेट्टी यांची घोषणा

सामना प्रतिनिधी । पुणे

आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नी अटी, शर्ती घालून सत्तापरिवर्तनासाठी एनडीएबरोबर गेलो, पण सत्ता आल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱयांचे प्रश्न सोडविण्यात कमी पडले. त्यामुळे भाजपबरोबर जाऊन भ्रमनिरास झाल्याचा ठपका ठेवत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारमधून बाहेर पडत एनडीएबरोबरही काडीमोड घेतल्याचे पक्षाचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी घोषित केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज येथे झाली. त्यामध्ये राज्यभरातून आलेल्या पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्यांनी एकमताने हात वर करून संघटनेची घोषणा देत सरकार आणि एनडीएमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला. लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुती करून स्वाभिमानी शेतकरी संघटना एनडीएमध्ये सामील झाली होती. तेव्हा त्यांनी सत्तेत आल्यानंतर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे शेतकऱयांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव आणि सातबारा कोरा करण्याची अट घातली होती. गेल्या पावणेचार वर्षांच्या सत्तेच्या काळात मोदी सरकारने याप्रश्नी निर्णय घेतला नाही. त्यामुळे भ्रमनिरास झाल्याचे सांगून शेट्टी यांनी काडीमोड घेत असल्याचे स्पष्ट केले. राज्यातील भाजप आघाडीसोबत असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना हा घटक पक्ष त्यांच्यातून बाहेर पडला आहे.