स्वच्छ भारत मोहिमेच लाचखोरी, ३ अटकेत

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेला संभाजीनगर येथे घडलेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे डाग लागला आहे. केंद्र सरकारकडून संभाजीनगरमधील स्वच्छता मोहिमांची पाहणी करण्यासाठी आलेल्या ३ जणांच्या पथकाने पालिकेच्या आयुक्तांकडे लाच मागितली. संभाजीनगर शहराला अव्वल शहरांच्या यादीत समाविष्ट करुन देण्याच्या बदल्यात पाहणी करण्यासाठी आलेल्यांनी आयुक्तांकडे पैसे मागितले.

महानगरपालिका आयुक्त प्रकाश बकोरिया यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लाच प्रकरणाची माहिती दिली आणि सापळा रचण्यात आला. लाच मागणाऱ्यांना पहिल्या टप्प्याचे १ लाख ७० हजार रुपये देण्याची तयारी आयुक्तांनी दाखवली. हे पैसे घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोर पथकाच्या सदस्यांना पकडले.

स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत पाहणीचे काम खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीतून आलेल्या तीन सदस्यांच्या पथकाने लाच म्हणून ५ लाख रुपये रोख रक्कम मागितली होती. तसेच पाहणीच्या निमित्ताने संभाजीनगरमध्ये राहून तिघेजण दररोज २५-३० हजार रुपयांची दारू ढोसत होते; अशी माहिती पुढे आली आहे.

पकडण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी संभाजीनगरच्या आधी पिंपरी-चिंचवड, नांदेड, हिंगणघाट, वर्धा या ठिकाणी पाहणी केली होती.