‘स्वामी समर्थ श्री’ रविवारी, अडीच लाखांची रोख बक्षिसे

सामना प्रतिनिधी । मुंबई

नेहमीच युवकांच्या कला आणि क्रीडागुणांना संधी देणाऱ्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील पीळदार शरीरसौष्ठवपटूंना एका व्यासपीठावर आणण्यासाठी स्वामी समर्थ श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले आहे. येत्या रविवारी ११ मार्चला प्रभादेवीच्याच दत्तू बांदेकर चौकात या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार प्रभादेवीकरांना अनुभवता येईल. या स्पर्धेसाठी मुंबईसह, पुणे, रायगड, कोल्हापूर, ठाणे, सातारा येथील सुमारे शंभरपेक्षा अधिक नामवंत शरीरसौष्ठवपटू आपली पीळदार देहाचे दर्शन घडवतील, अशी माहिती मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी दिली.

मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी समर्थ गेले काही महिने विविध उपक्रम राबवत आहेत. त्याच उपक्रमांची मालिका कायम राखताना मंडळाने अडीच लाखांपेक्षा अधिक रोख रकमेचे पुरस्कार असलेल्या राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे भव्यदिव्य आयोजन केले आहे.

बृहन्मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि मुंबई उपनगर बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेसाठी राज्यभरातील शरीरसौष्ठवपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे स्वामी समर्थ श्री साठी दमदार खेळाडूंमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी बोलून दाखविला. या स्पर्धेसाठी मुंबई श्री सुजन पिळणकर, उपविजेता सकिंदर सिंग, संदेश सकपाळ, श्रीनिवास खारवी या मुंबईकरांसह श्रीनिवास वास्के आणि मि. वर्ल्डचा सुवर्णपदक विजेता महेंद्र चव्हाणही उतरणार आहे. त्याचबरोबर अनेक दिग्गज आणि नामवंत शरीरसौष्ठव स्वामी समर्थ श्रीमध्ये आपले पीळदार स्नायू दाखवतील, अशी माहिती शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस सुनील शेगडे यांनी दिली.

एकंदर सात गटात रंगणाऱ्या या स्पर्धेत गटविजेता ७ हजार रूपयांचा मानकरी ठरेल. त्याचबरोबर अन्य चार क्रमाकांना ६, ५, ३ आणि २ हजारांचे इनाम दिले जाणार आहे. गटात स्थान मिळविणाऱ्या ३५ खेळाडूंवर तब्बल पाऊणे दोन लाख रूपयांच्या रोख पुरस्कारांची उधळण केली जाणार आहे. स्पर्धेचा विजेता ५१ हजार रूपये आणि आकर्षक स्वामी समर्थ श्री चषकाचा मान मिळवेल, अशी माहिती स्पर्धाप्रमुख जयराम शेलार यांनी दिली. या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, आमदार अजय चौधरी, सुनील शिंदे, मंगेश कुडाळकर यांच्या उपस्थितीत रंगेल.