आता जबाबदारी वाढली! – स्वानंद किरकिरे

गीतकार, गायक, लेखक म्हणून आजवर पडद्यामागे मी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. ‘चुंबक’च्या निमित्ताने मोठय़ा पडद्यावर अभिनय करणे हे खूप चॅलेंजिंग होते. आता अभिनेता म्हणून माझ्यावरची जबाबदारी वाढलीय असे मत स्वानंद किरकिरे यांनी व्यक्त केले.

गीतकार, गायक, लेखक म्हणून स्वानंद किरकिरे यांनी बॉलीवूडमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. परंतु अक्षयकुमार प्रस्तुत आगामी ‘चुंबक’ या सिनेमात स्वानंद मुख्य भूमिका साकारत आहेत. आपल्या या वेगळ्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले, अभिनयाची आवड मला आधीपासूनच होती. सुरुवातीच्या काळात मी काही नाटकांमध्ये काम केले होते. अधून-मधून बॉलीवूडच्या काही सिनेमांमध्येही मी लहानशी भूमिका साकारली होती. पुढे लेखन, गायन यामुळे अभिनयाची आवड काही काळ मागे पडली होती. ‘चुंबक’च्या निमित्ताने पुन्हा एकदा मला अभिनय करण्याची संधी मिळाली.

सिनेमाची ऑफर कशी मिळाली ते सांगताना ते म्हणाले की, निर्मात्यांनी मला बोलावले तेव्हा एखाद्या चित्रपटाच्या संगीतासाठी चित्रपटाची टीम मला भेटते आहे असे मला काटले. पण तिथे गेल्यानंतर मला ‘चुंबक’ची स्क्रिप्ट ऐकवली. त्यातील प्रसन्नाच्या मुख्य भूमिकेसाठी मला विचारणा केली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. ही भूमिका आव्हानात्मक होती, पण निर्मात्यांचा माझ्यावरच्या विश्वासामुळे मी हे आव्हान स्वीकारले.

‘चुंबक’मध्ये स्वानंद यांनी प्रसन्ना नावाच्या निरागस आणि गतिमंद अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारली आहे. प्रसन्नच्या भूमिकेसाठी काय तयारी केलीस याविषयी ते म्हणाले, या भूमिकेसाठी मी आपल्या आसपासच्या लोकांचे निरीक्षण केले. त्यानंतर या क्षेत्रातील डॉक्टर आणि समुपदेशक यांच्याशी चर्चा करत ही व्यक्तिरेखा आकाराला आली. पडद्यावर आणि पडद्यामागे काम करण्याचा अनुभवाविषयी ते म्हणाले की, पडद्यावर काम करणं हे खूप कठीण आहे. अभिनेता म्हणून संपूर्ण सिनेमाचा यश अपयशाची जबाबदारी आता माझ्या खांद्यावर आहे. जबाबदारी असली तरी मोठय़ा पडद्यावर काम करण्याची बात काही औरच आहे.

‘चुंबक’च्या निमित्ताने प्रेक्षकांना एक चांगली कलाकृती पाहण्याचा आनंद मिळेल. आपल्या आयुष्यात जे प्रश्न असतात की कुठल्या वाटेवर जावे… कुठल्या नाही, याचे उत्तर सिनेमात नक्कीच सापडेल, अशी मला आशा आहे असेही स्वानंद किरकिरे यांनी अखेरीस स्पष्ट केले. संदीप मोदी दिग्दर्शित हा सिनेमा २७ जुलै रोजी प्रदर्शित होत आहे.

मराठी सिनेमाला तोड नाही!

नाटय़परंपरा, साहित्य परंपरा यामुळे मराठीत आजही दर्जेदार सिनेमांची निर्मिती होत आहे. विविध विषयांकर आधारित कलाकृती सादर करण्याचे धाडस निर्माते दाखवत आहेत. त्यामुळे बाकी सगळय़ांपेक्षा मराठी सिनेमा हा खूप पुढे आहे असेही स्वानंद यांनी सांगितले.