स्वप्नांचा खडतर प्रवास…

अनुराधा राजाध्यक्ष,[email protected]

स्वप्नील गांगुर्डे… नवोदित लेखक. आजच्या बऱयाच लेखकांचा प्रवास हा मालिका, चित्रपटांतून सुरू होतो. अर्थात सोपं नसतंच तिथेही काहीच…

‘मी तेव्हा आठ-नऊ वर्षांचा असेन.. आई-बाबांबरोबर घराकडे निघालो होतो. नदीच्या पुलावरून चालताना आईचा पाय घसरून ती पाण्यात पडली. मी ओरडून रडायला लागलो. वडील शांतपणे चालत आले. पाण्यात उडी घेतली आणि आईला वाचवलं. कुठल्याही प्रसंगाला धीरानं सामोरं जाण्याची शिकवण, त्या बापमाणसानं दिली..’ झी युवावर सध्या गाजत असलेल्या ‘बापमाणूस’चा पटकथा लेखक स्वप्नील गांगुर्डे त्याच्या आयुष्याचा आणि लेखनाचा प्रवास सांगत होता..

‘आई इन्कम टॅक्स ऑफिसरची मुलगी. बदाम आणि चॉकलेटनं भरलेल्या बरण्या असायच्या तिच्या घरात. तिचं लग्न झालं माझ्या बाबांशी. एमएसईबीमध्ये ३००/४०० रुपये पगारावर नोकरीला होते ते. गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये पुढे परमनंट होतील ते, असं वाटून लग्न झालं होतं त्यांचं. दिंडोरी रोडला झोपडपट्टीत संसार सुरू झाला दोघांचा. काटकसरीनं. प्रत्येक रुपया योग्य कारणासाठी खर्च व्हावा म्हणून दक्ष असायची ती. चार आणे देऊन गोळ्या घेतल्याचं कधी स्मरणात नाही माझ्या. उलट ती म्हणायची, घरातले चार घास खा, अंगाला लागतील तुझ्या. वडील परमनंट झाले आणि त्यांची बदली निफाडमध्ये मौजे सुकाणेला झाली. तिथं एकमुखी दत्त मंदिर. चक्रधर स्वामींची यात्रा भरते तिथे. घर शेणामातीचं. कौलारू. घराच्या मागे पुढे अंगण. पाणी बाहेरून भरावं लागायचं. बाथरूमला बाहेर जावं लागायचं. पाणी भरायचं, घर सारवायला शेण आणायचं, भांडी घासायची, कपडे धुवायचे अशी सगळी कामं करायचो मी. आजूबाजूची लोकं बघतात म्हणून कधी काम करायला नकार दिला तर, काम केल्याशिवाय आई घरातच घ्यायची नाही.’

माझ्या मित्रांचे वडील बँकर, प्रोफेसर, मोठे मोठे शेतकरी. त्यांच्याकडे गाडय़ा होत्या, बंगले होते. आमच्या घरी प्रचंड काटकसर सुरू झाली, तेव्हा त्या मित्रांकडे जायचो. तिथे खाऊ मिळायचा. तिथेच खरी माणसं कळली मला. सकाळी पाच वाजता घंटा वाजली देवळात की जाग यायची. तीच सवय अजूनही आहे, लवकर उठायची.

त्याच्या आयुष्याचं दुसरं पर्व म्हणजे पाचवी नंतरचं हॉस्टेल लाईफ. मोफत शिक्षणासाठी जवाहर नवोदय विद्यालयात एक एंट्रन्स एक्झाम देऊन तो दाखल झाला आणि वडिलांची गावातली कॉलर ताठ झाली. स्वप्नील सांगत होता, ‘घर सोडून जायचं म्हणून मी रडत होतो. पण आई खंबीर होती. माझ्यासमोर नाही पण मी गेल्यावर ती रडली हे मला नंतर कळलं. त्यावेळी मी लिहिलेली पत्रं अजून जपून ठेवली आहेत तिनं. तिथे रॅगिंगचा अनुभव आला मोठय़ा मुलांकडून. पण आदिवासी पाडय़ातल्या मुलांशी मैत्रीसुद्धा झाली. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आमची भाषा एक होती. मराठीच्या पाटील मॅडम, वाचनालयाचे खिल्लारे सर, यांचं लक्ष असायचं माझ्याकडे. वाचनाचा वेगळा तास असायचा तिथे. कविता कशी करायची हे पाटील मॅडमनं शिकवलं.

गंमत म्हणजे तबल्याच्या एका आंतरशालेय स्पर्धेत भाग घेतला आणि माझा नंबर लागला. पी. सी. अलेक्झांडर यांच्यासमोरसुद्धा तबलावादन झालं आणि मग संपूर्ण शाळेचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. पण स्पर्धेनंतर आठ दिवसांवर सहामाही परीक्षा होती. इंग्लिशचा पहिला पेपर होता. मला खूप टेन्शन आलं होतं आणि मित्रांनी मला इंग्लिशची प्रश्नपत्रिकाच देऊ केली. मी पहिल्यांदा ती नाकारली, पण अभ्यास होईना म्हणून मग घेतली. त्यातल्याही प्रश्नांची उत्तर पाठ होईनात, म्हणून पॅडखाली वहीत दडवून ती नेली आणि पकडला गेलो. ज्या शाळेत मला खूप रिस्पेक्ट होता तिथेच अपमानित झालो. धडा शिकलो की नापास झालो तरी चालेल, पण कॉपी करायची नाही. सातवीत असताना मी कविता लिहिली होती आणि आठवीत कादंबरी.

स्क्रिप्ट रायटिंग कोर्सबद्दल एकदा वाचलं आणि मग मी तो करायचं ठरवलं. अचानक असा अकरा बारा हजार रुपये देऊन स्क्रिप्ट रायटिंगचा कोर्स? तोही मुंबईला? आई-वडिलांना प्रश्न नाही पडला? ‘परिस्थिती नसताना हे असे नसते उद्योग करू नकोस’ असं म्हणाले नाहीत ते? मी साहजिकच विचारलं, तेव्हा स्वप्नील पटकन म्हणाला, ‘जेव्हा जेव्हा मी म्हणालो की मला उडायचंय, तेव्हा तेव्हा माझ्या आईवडिलांनी छप्पर फाडून उडायला दिलं’. स्क्रिप्ट रायटिंगच्या त्या कोर्समुळे स्वप्नीलच्या हाती फार काही लागलं नाही, पण लिखाणाची उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. म्हणूनच तो मुंबईला आला.

एक मात्र होतं की एवढय़ा अनुभवानंतरही त्याच्यातला आशावाद टिकून होता आणि हेही दिवस जातील यावरची त्याची नितांत श्रद्धा, त्याला त्याच्या स्वप्नपूर्तीची वाट दाखवत होती. त्याच्या या धडपडीला कलाटणी कशी मिळाली हे सांगताना, त्यानं नाव घेतलं ते सुनील परब या दिग्दर्शकाचं. तो म्हणाला, ‘माझी सर्वात ग्रेट वाटणारी कथा मी त्यांना वाचायला दिली आणि पाच मिनिटात त्यांनी त्याचे तुकडे केले. मला रागच आला. मनात आलं, आवडली नव्हती तर सांगायचं, फाडायची कशाला ती? पण मी नवखा होतो. हे विचारायचं धाडस नव्हतं माझ्यात. मग मी लक्ष केंद्रित केलं, कथा कशी असते, याबद्दल ते जे सांगत होते त्याच्यावर. मग मी एकूण ६२ ड्राफ्ट लिहिले. दरवेळेला ते ती कथा नाकारायचे आणि मी पुन्हा पुन्हा लिहायचो. अखेरीस त्यांना ती कथा आवडली आणि मला मी लेखक म्हणून सापडलो. कारण एकाच कथानकाकडे ६२ प्रकारे मी पाहू शकलो होतो. स्वतःच्या लिखाणाच्या प्रेमात लेखकानं पडायचं नसतं, हेच मी त्यातून शिकलो.’ स्वप्नीलची प्रचंड सकारात्मकताच यातून मला जाणवली.

‘ज्यानं चोच दिली तोच दाणापाणीही देतो’.. याच न्यायानं स्वप्नीलला एका फिल्मच्या लिखाणाची ऑफर आली आणि पुन्हा एकदा गाडी रुळावर आली. प्रेम हे मधल्या कथेनंतर ‘बापमाणूस’बद्दल त्याला विचारलं गेलं. स्वप्नील म्हणाला, ‘दहा महिने या कथेवर मी काम केलं. व्यक्तिरेखा, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध, संघर्ष, माझ्या डोक्यात ठाम होता. पण पहिल्यांदा जेव्हा मी स्क्रीनप्ले वाचला तेव्हा तो आवडलाच नाही त्यांना. अपमानित झालो मी. इतका की रडायचाच बाकी होतो. वाटलं, माझ्या लिखाणावर या नऊ-दहा वर्षांच्या मेहनतीनंतरही अशी प्रतिक्रिया येत असेल तर चिंताजनकच बाब आहे. पण मग माझ्या लक्षात आलं की तो स्क्रीनप्ले त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तो रिड्राफ्ट करायला हवा. मग बदललेला स्क्रीनप्ले मी जेव्हा वाचला, तेव्हा त्याला टाळ्या मिळाल्या. ६२ वेळा लिहीलेल्या कथेमुळेच, ही रिड्राफ्टची किमया स्वप्नीलला साधली, हे त्यानंच मान्य केलं. तुम्ही किती वेळा पडता ते महत्त्वाचं नसतं. पडल्यानंतर तुम्ही किती वेळा पुन्हा उभे राहता त्यावर तुमचं यश अवलंबून असतं, हे वाक्य स्वप्नीलच्या या प्रयत्नांना निश्चितच लागू होतं असं मला वाटलं.

आज ‘बापमाणूस’मुळे स्वप्नीलवर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. ‘बापमाणूस’मुळे आपल्या आयुष्याला ऑक्सिजन मिळाला, हे त्यानंही कबूल केलं. स्वप्नीलनं त्याचा बापमाणसांसाठी म्हणजेच त्याच्या आईवडिलांसाठी मात्र नाशिकला घर घेतलंय. त्यातलं फर्निचर, खास पुस्तकांसाठी आणि पुरस्कारांसाठी योग्य असं बनवलंय. रंग, फोटो फ्रेम्स, पडदे, सगळं त्याच्याच पसंतीचं आहे. पूर्वी आई भाजी ओल्या फडक्यात ठेवायची, आता ती फ्रिजमध्ये ठेवते. पाणी मात्र ती अजूनही माठातलंच पिते. इतर लेखकांच्या घरी मी जायचो, तेव्हा त्यांच्या नावाची नेमप्लेट बघायचो. नाशिकच्या घरी मी तशीच नेमप्लेट माझ्या आई-वडिलांच्या नावानं बनवून घेतली आणि लावली. केवढा आनंद झाला त्यांना. नाशिकला गेलो की तिथून माझा पाय निघत नाही. आईच्या हातचं जेवण आणि त्या घराचा मला लळा लागतो. म्हणूनच माझ्या मुंबईच्या घरात मी कामात स्वतःला बुडवून घेतो.’ बोलता बोलता तो हळवा झाला. ‘बापमाणूस’सारख्या मालिकेतून, नातेसंबंधांना अलवारपणे उलगडणाऱया आणि ओढून ताणून आणलेल्या कलहापेक्षा, ध्येयाधिष्ठाrत संघर्षातून नाटय़ निर्माण करणाऱया स्वप्नीलच्या व्यक्तिरेखा, प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात, कारण त्याच्या आयुष्यातल्या अनेक कडू गोड आठवणींचा खजिना त्याच्या लिखाणात सहज अवतरतो. त्याच्या आयुष्यातल्या बापमाणसांनी म्हणजेच त्याच्या आईवडिलांनी जो संघर्ष अनुभवला आणि ध्येयासक्तीचे, शिस्तीचे,जे धडे स्वप्नीलकडून गिरवून घेतले, त्यालाच तो या सगळ्याचं श्रेय देतो.