स्वप्नील जोशी सोबत रंगणार ‘यारी नंबर वन’चं होस्टिंग

सामना ऑनलाईन । मुंबई

मैत्री ही ठरवून करता येत नसते ती आपसूकच होते. देवाने आपल्या सर्वाना दिलेली ती एक अमुल्य देणगी असते. आयुष्याच्या प्रत्येक सुख – दु:खात कुठलाही विचार न करता शेवटपर्यंत खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा असतो तो म्हणजे आपला मित्र, दोस्त, सखा, यार… याच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मॅकडॅावलस नंबर १ सोडा आणि व्हूय अॅप हे ‘नंबर १ यारी विथ स्वप्नील’ हा हटके कार्यक्रम घेऊन येत आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन सर्वांचा लाडका आणि सगळ्यांचा जिवलग यार स्वप्नील जोशी करणार आहे. कार्यक्रमाचे निर्माते आणि दिग्दर्शन सचिन पिळगावकर करणार आहेत. मराठी सिनेयुगात वडील आणि मुलगा तसेच अत्यंत जवळचे हे दोन मित्र मिळून पहिल्यांदाच मराठीत ‘यारी’वर बेतलेला कार्यक्रम घेऊन येत आहेत.

स्वप्नील जोशीने नुकताच या कार्यक्रमाचा टीझर त्याच्या सोशल नेटवक्रिंग साईटवर अपलोड केला आहे. टीझर पाहूनच स्वप्नीलच्या चाहत्यांमध्ये कार्यक्रमाबद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. स्वप्नीलने या आधी सुध्दा अनेक कार्यक्रमांचे निवेदन केले आहे. स्वप्नीलकडे लोकांना आपलंसं करून घेऊन बोलक करण्याची युक्ती आहे त्यामुळेच काही अबोल कलाकारही कॅमेरासमोर कधीही सांगणार नाहीत असे गुपीत कार्यक्रमात सहज सांगून जातात.

कार्यक्रमाविषयी स्वप्नील जोशी सांगतो, “नंबर १ यारी हा पहिलाच मराठी कार्यक्रम आहे जो मैत्री या नात्यावर आधारलेला आहे. तसेच हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास आहे कारण सचिन पिळगावकर जे माझ्यासाठी माझ्या बाबांसारखे आहेत आणि तितकेच जवळचे मित्र पण आहेत ते हा कार्यक्रम दिग्दर्शित करणार आहे. माझ्या आयुष्यात त्याचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे. जसा जसा कलाकार प्रसिद्ध होत जातो त्याचे खाजगी आयुष्य तो सर्वांपासून लपवत जातो. माझं खरं काम हे असेल की मी त्यांना कस बोलकं करेन. तसेच त्यांच्या मैत्रीच महत्व त्यांच्या आयुष्यात किती आणि कसे आहे हे प्रेक्षकांपर्यंत आणणे. त्यांचे किस्से, गप्पा, मज्जा, धमाल हे सगळ मी तुमच्यापर्यंत आणणार आहे.”

गप्पांसोबतच कार्यक्रमात कलाकारांसोबत स्वप्नील वेगवेगळे खेळ सुध्दा खेळणार आहे. दोन मित्र एकमेकांना किती चांगल्या पद्धतीने ओळखतात हे आपल्याला यातून बघायला मिळेल. स्वप्नीलचा हा भन्नाट कार्यक्रम कलर्स मराठी या वाहिनीवर १८ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ६ ते ७ वाजता सुरू होणार आहे.