दिंडोशीत रहदारीमुक्त रस्त्यावर आबालवृद्धांची धमाल-मस्ती; स्वेट ऑन स्ट्रीटमुळे रहिवाशांमध्ये नवा उत्साह आणि जोश

दिंडोशीच्या रहेजा गार्डन येथील सुमारे एक किलोमीटर रहदारीमुक्त रस्त्यावर आबालवृद्ध, महिला, पुरुष अशा सर्व वयोगटातील व्यक्तींनी आज सकाळच्या वेळी ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ कार्यक्रमात खेळ आणि व्यायामाचा आनंद घेत धमाल-मस्ती केली. युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे हे चौथे वर्ष असून 10 डिसेंबरला या कार्यक्रमाचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे.

मुंबईमध्ये सध्या मैदाने, मोकळय़ा जागा कमी झाल्या असून मुलांना खेळायला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही आहे आणि हीच बाब लक्षात घेऊन युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि ‘स्वेट ऑन क्लब’ यांनी हा उपक्रम येथे राबवला. याचा आनंद रहेजा हाईट्स, वसंत व्हॅली, गोकुळधाम, म्हाडा संकुल, न्यू म्हाडा, सॅटेलाईट कॉलनी, यशोधाम व्हॅलेंटाईन अपार्टमेंट, नागरी निवारा संकुल, सुचिधाम, दिंडोशी वसाहत, शिवशाही, श्रीकृष्णनगर, संतोषनगर इत्यादी वसाहतीतील दिंडोशीवासीयांनी घेतला. आम्ही हाती घेतलेल्या उपक्रमाची पोचपावती ही या कार्यक्रमाला जमलेली गर्दी ही आहे, असे युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित सुनील प्रभू यांनी म्हटले. यावेळी आमदार सुनील प्रभू यांच्यासह युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, साईनाथ दुर्गे, ‘हास्य जत्रा’ फेम अभिनेते गौरव मोरे, सिने-अभिनेते ‘बिग बॉस’ फेम एजाज खान यांच्यासह सर्व शिवसेना, युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

खेळ, योग, मानसिक आरोग्य
सर्व वयोगटासाठी झुंबा, खेल-ओ-कबड्डी, कमांडोज-एक्स-फॅक्टर, रिंग फुटबॉल, जिम-फिट-मॅनिया, बिग साइज गेम्स, मिस्ट्री एस्केप रूम क्रिकेट, बॅडमिंटन, कराटे, स्केटिंग, बुद्धिबळ, व्यायाम व फिटनेस प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, पॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप त्याचबरोबर योगासनांची प्रात्यक्षिके, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे आणि आलेल्या अडचणींवर कसे मिळवायचे यावर उपाय आणि मार्गदर्शन केले गेले.