गोड बालूशाही

साडेतीन मुहुर्तांपैकी एक म्हणजे  ‘गुढीपाडवा’ ….  आणि पाडवा म्हटलं की गोड आलंच.आपण श्रीखंड, पुरणपोळी हे पदार्थ हे खास मराठमोळे म्हणून खात असतो. पण, बालूशाही आपण क्वचितच करतो. यंदा पाडव्याला नेहमीपेक्षा वेगळा गोड पदार्थ म्हणून ‘बालूशाही’ करून पाहा.

साहित्य :
४ वाट्या मैदा
अर्धी वाटी डाळीचे पीठ
१ वाटी तूप
अडीच वाट्या साखर
५-६ वेलदोड्यांची पूड
तळण्यासाठी तूप.

कृती :
तूप गरम करून घ्यावे. दोन्ही पिठे एकत्र करून त्यात तुपाचे मोहन घालावे. नंतर पुरीसाठी पीठ भिजवतो तसे भिजवावे. साखरेत पाणी घालून दोनतारी पाक करावा. त्यात वेलदोड्याची पूड घालावी. पिठाचा मोठ्या पेढ्याएवढा गोळा घ्यावा. आपण कडबोळ्याला लांबट वलून घेतो तसे वळून घ्यावे. नंतर या पिठाचे कडबोळ्याप्रमाणे करावे. पण वळताना गोल एकमेकांवर यावे. नंतर हाताने दाबून पुन्हा पेढ्याचा आकार द्यावा. ही बालुशाही जास्त खुसखुशीत होते. अशी खुसखुशीत बालूशाही हलक्या बदामी रंगात येईपर्यंत तळा व पाकात टाका. झाली तुमची खास पाडव्याची बालूशाही तयार. त्यावर किसलेला बदाम किंवा पिस्ता टाका आणि सर्व्ह करा.