नाताळबाबाचा फराळ

>>रूपा परेरा<<

नाताळचा फराळ. कालच नाताळबाबाचं आगमन झालंय. आता आठ दिवस नाताळबाबा बच्चेकंपनीला, आपल्याला भरपूर खाऊ वाटेल. केक्स, चॉकलेट्स यांची नुसती रेलचेल असेल. आपल्याकडची एकात्मता आपल्या प्रत्येक सणात प्रतिबिंबित होते. एकमेकांच्या सणात तितक्याच उत्साहाने सामील होणंखाद्यपदार्थांचा आस्वाद घेणं यात आपण सगळेच पुढे असतो. ज्याप्रमाणे आपला दिवाळीचा फराळ असतो तसाच नाताळचाही मजेशीर आणि चविष्ट फराळ असतो. पाहूया हा आगळावेगळा फराळ

कूल कूल

cool-cool

साहित्य : ३०० ग्रॅम मैदा, तीन चमचे बटर, ५० ग्रॅम पिठीसाखर, १ चमचा व्हॅनिला इसेन्स, अंडे, नारळाचे दूध, मीठ.

कृती : एका ताटात मैदा घ्यायचा त्यात थोडेसे मीठ टाकायचे. नंतर त्यात अंडय़ाचा बलक, पिठीसाखर, व्हॅनिला एसेन्स, बटर एकत्र करून त्यात नारळाचे दूध ओता आणि पीठ घट्टसर मळून घ्यावे. त्या गोळ्यावर एक कपडा ठेवून एक तास तसाच ठेवून द्या. पीठ थोडे फुगलेले दिसले की, त्याचे एक इंचाचे चपटे गोळे करून त्यावर नव्या फणीने किंवा काटाचमच्याने छापा देऊन त्याचा रोल करायचा. सगळं झाल्यावर कढईत तेल गरम करून कूल कूल सोडावेत. बारीक गॅसवर खरपूस तळून घ्यावेत.

बोलिना

bolina

साहित्य : खवलेला नारळ, रवा व साखर प्रत्येकी पाव किलो, तूप व बेकिंग पावडर प्रत्येकी  एक चमचा, तीन अंडी, वेलची, मीठ, पिठीसाखर

कृती : अर्धा कप पाण्यात साखरेचा पाक करुन घ्या. खवलेले खोबरे अर्धा कप पाणी घालून मिक्सरला वाटून घ्यायचे. साखरेच्या पाकात रवा व खोबरे एकत्र करा.  त्यात चिमूटभर मीठ व तूप मिसळून मिश्रण एकजीव करा. हे मिश्रण रात्रभर तसेच ठेवा. नंतर अंडय़ाच्या पिवळ्या बलकात वेलची, मैदा आणि बेकिंग पावडर मिक्स करा. एका अंडय़ाच्या पांढऱया भागात बोलिना पिठ घालून फेटून घ्यायचे. सर्व मिश्रणाला कटलेटसारखा आकार द्यायचा. ओव्हनमधून काढल्यावर थंड झाले की सर्व्ह करायचे.

ख्रिसमस फ्रूट केक

froot-cake

साहित्य : ४०० ग्रॅम नेस्टले मिल्कमेड स्वीटेंड कण्डेन्स मिल्क,  पाव चमचा दालचिनी पावडर, एक चमचा सोडा बायकार्बोनेट, एक चमचा बेकिंग पावडर, दोन कप मैदा, १/३ कोमट पाणी, पाऊण कप साखर, १०० ग्रॅम बटर, अर्धा चमचा जायफळ पावडर, ड्राय फ्रुट्स, टुटीफ्रुटी १५०मिली एरिएटेड सोडा, कॅरेमल सिरप.

कृती : पॅनमध्ये साखर विरघळवून घ्यायची. त्यात थोडे पाणी घेऊन कॅरेमल सिरप तयार करून बाजूला ठेवायचे. नंतर दुसऱया बाऊलमध्ये मैदा, बेकिंग पावडर, सोडा बायकार्बोनेट, दालचिनी, जायफळ पावडर चाळून घ्यायचे. त्यात ड्राय फ्रुट्स, टुटीफ्रुटी मिसळायचे. एका पॅनमध्ये बटर घ्यायचे. त्यात कंडेन्स मिल्क, एरिएटेड सोडा, कॅरेमल सिरप टाकायचे. आता शेवटी ग्रीसिंग केलेल्या व तळाशी बटर पेपर लावलेल्या केकच्या भांडय़ात तयार मिश्रण ओतावे व डबा टँप करावा. प्रिहीट ओवनला १८०  डिग्री सेल्सियस तापमानाला 50 मिनिटे ठेवावा.