गोरापान रसगुल्ला

293

नमिता वारणकर

गोरापान रसगुल्ला कोणाचा… ओदिशा की पश्चिम बंगाल… कोणाचा का असेना… सगळ्यांना सामावून घेणाऱया मराठी मनाची रसवंती रसगुल्ला वाढवतो….

साखरेच्या पाकात निथळणारे पांढरे शुभ्र, मऊ, लुसलुशीत  गोल गोळे… पाहताचक्षणी तोंडाला पाणी सुटतं… दोन बोटांच्या चिमटीत धरून गळणाऱया पाकाला सांभाळत तो अलगद तोंडात कधी विरघळतो कळतही नाही… दूध नासवून तयार केलेल्या पनीरपासून बनवलेली ही मिठाई म्हणजे ‘रसगुल्ले’… बंगालमधील हलवाई नवीनचंद्र दास यांनी १८६८ साली हा पदार्थ सर्वप्रथम तयार केला… हलकीफुलकी मावा घालून तयार केलेली ही गोड मिठाई देशभरात सर्वाधिक पसंत आहे… बंगालमधील हा पदार्थ रॉशोगुल्ला, रसगोले, छेने के रसगुल्ले, चमचम, बंगाली रसगुल्ला अशा अनेकविध नावांनी प्रसिद्ध आहे… शिवाय याला धार्मिक महत्त्व असून ओडिशामध्ये चक्क ‘रसगुल्ला दिन’ पाळला जातो… परदेशात ही हिंदुस्थानी मिठाई म्हणून रसगुल्ला नावारूपाला आलाय…महाराष्ट्रातही तितकाच लोकप्रिय आहे… मात्र सध्या या बंगाली मिठाईवर ओडिशा राज्यानेही भौगोलिक संकेतांक मिळण्यासाठी सरकारकडे दावा केला आहे. याकरिता केलेले हे ‘रसगुल्ला पुराण’.

पश्चिम बंगालने रसगुल्ल्याच्या जीआय टॅगसाठी चेन्नईच्या जीआय नोंदणी कार्यालयात सप्टेंबर २०१५ साली अर्ज केला होता, मात्र ‘बंगाली रसगुल्ला’ अशी ओळख असलेल्या या पदार्थावर ओडिशानेही हरकत घेतली. त्यांनीही आपली या पदार्थाबाबतची ऐतिहासिक माहिती भौगोलिक संकेतांक कार्यालयाला पाठवून ‘ओडिशा रसगुल्ल्या’साठी जिओग्राफीकल टॅगची मागणी केली आहे.

दार्जिलिंगचा चहा, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, जयपूरची मातीची भांडी, बनारसी साडी, तिरुपतीचे लाडू, काश्मिरी पश्मिना, नागपूरची संत्री या वस्तू आणि पदार्थांना जीआय टॅग लाभला आहे. एखाद्या भूभागाची ओळख जगभर प्रसिद्ध होण्याचा मार्ग या जीआय टॅगमुळे खुला होतो. शिवाय त्या पदार्थाची किंवा वस्तूची विक्री करतानाही त्याच्या अधिकृततेवर शिक्कामोर्तब हेते. त्यामुळे जीआय टॅगचे विशेष महत्त्व आहे.

समृद्ध वारशाची ओळख

भौगोलिक संकेतांक (जिओ) हा विशिष्ट भौगोलिक प्रदेशात उगम पावलेल्या  कृषी, नैसर्गिक किंवा उत्पादित वस्तूंसाठी असतो. यामध्ये हस्तकला आणि औद्योगिक वस्तूंचाही समावेश आहे. समृद्ध वारशाबरोबरच वस्तूंचे मोल वाढवणे, त्याची जगभरात ओळख निर्माण करणे, यातून उद्योगाला चालना मिळून देशातल्या शेतकऱयांच्या, कारागिरांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी भौगोलिक संकेतांकाची मदत होते.

रसगुल्ल्याची गोष्ट…

रसगुल्ल्याविषयी पुराणात अशी कथा सांगितली जाते की, एक दिवस भगवान जगन्नाथ लक्ष्मीदेवीला न सांगताच रथयात्रेसाठी निघून गेले. ते जेव्हा रथयात्रेहून परत आले तेव्हा आपल्याला सोबत नेले नाही म्हणून लक्ष्मीदेवी त्यांच्यावर रुसल्या. रागाने त्यांनी जयविजय दार बंद करून घेतलं. तेव्हा रुसलेल्या देवीला प्रसन्न करण्यासाठी भगवान जगन्नाथ त्यांच्यासाठी रसगुल्ला घेऊन आले. तेव्हापासून लक्ष्मीदेवीला रसगुल्ल्यांचा नैवेद्य दाखवला जातो. ज्या दिवशी रथयात्रा पूर्ण होऊन ती श्रीमंदिराकडे परत जाते त्याला ‘निलाद्री बिजे’ असे म्हणतात. हा जगन्नाथ यात्रेचा शेवटचा दिवस असतो. हा दिवसच ‘रसगुल्ला दिवस’ किंवा ‘रसगोला दिवस’ या नावाने साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना रसगुल्ला दिला जातो. तसेच यात्रेदरम्यान भाविक रसगुल्ला अर्पण करतात. ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिरात रसगुल्ल्याचे उगमस्थान मानले जाते. १२ व्या शतकापासून मंदिराच्या पूजाविधीमध्ये त्याचा समावेश आहे. त्याला येथे ‘पहाला रसगुल्ला’ म्हटले जाते. ही प्रथा एक हजार वर्षे जुनी असल्याचे जगन्नाथ संस्कृतीचे सुप्रसिद्ध जाणकार सूर्यनारायण रथ शर्मा सांगतात.

मॉडर्न रसगुल्ला

बंगाली मिठाईत मऊ आणि क्रिमी ओडिशा रसगुल्ला, पांढराशुभ्र, रबरी बंगाली रसगुल्ला, केसरचे मिश्रण भरून बनवलेला राजभोग रसगुल्ला, पहाला रसगुल्ला, संत्र्याच्या स्वादाचा कमलाभोग रसगुल्ला असे अनेक प्रकार शिवाय बेक्ड रसगुल्ला हा मॉडर्न प्रकारही बाजारात मिळतो.

अंतराळवीरांसाठी…

रसगुल्ल्याला जागतिक स्तरावर नेण्याचं श्रेय हलवाई क्रिष्णा दास यांना दिलं जातं. त्यांनी १९३० साली रसगुल्ल्यांना डबाबंद पॅकमध्ये विकण्यास सुरुवात केली. त्यामुळे रसगुल्ला हिंदुस्थानबाहेरही गेला आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आज हिंदुस्थानसह पाकिस्तान, दक्षिण आशिया, बांगलादेश, नेपाळ येथेही रसगुल्ला आवडीने खाल्ला जातो. महत्त्वाचे म्हणजे इस्रोनेही अंतराळवीरांसाठीही कोरडे रसगुल्ले तयार करण्याची तयारी दाखवली  होती.

लोककथा…

भुवनेश्वरमधील पहाला या गावात पूर्वी मोठय़ा प्रमाणात गोपालन होत होते. त्यामुळे भरपूर दूध उपलब्ध व्हायचे. काही वेळे दूध नासले की, ते फेकून दिले जात असे. जगन्नाथपुरी मंदिरातील एका पुजाऱयाने हे पाहिले आणि या ग्रामस्थांना नासलेल्या दुधापासून छेना म्हणजेच पनीर कसे तयार करायचे हे शिकवले. या पनीरपासूनच रसगुल्ले बनवले जाऊ लागले आणि पहाला गाव ‘छेना बाजार’म्हणून प्रसिद्ध झाले.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या