पाण्याअभावी मोसंबी बागा सुकल्या, शेतकऱ्यांची नूकसान भरपाईची मागणी

56

सामना प्रतिनिधी । पूर्णा

सालाबाद प्रमाणे यंदाही मराठवाडा भीषण दुष्काळाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याअभावी करपू लागली आहेत. पूर्णा तालुक्यातल्या पांगरा ढोणे येथील शतकऱ्यांच्या मोसंबी बागा पाणी आटल्याने सुकून गेल्या आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना  सरकारने तातडीने मदत करण्याची मागणी होत आहे.

पूर्णा तालुक्यातल्या पांगरा येथील भगवान नरोजी ढोणे यांनी त्यांच्या शेतात मोसंबीची लागवड केली आहे. सुरुवातील बोरच्या सहाय्याने बागेला पाणी दिले जात होते. मात्र बोरचे पाणी आटल्याने त्यांनी टँकरने पाणीपुरवठा करून मोसंबीची बाग फुलवली होती. मात्र आता टँकरचा पाणी पुरवठाही बंद झाला आहे. नागरिकांना पिण्यासाठीदेखील पाणी मिळत नसल्याने झाडांना पाणी आणणार कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिव लावून फुलवलेली मोसंबीची 220 झाडे अक्षरश: सुकून गेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी तर बुलडोझर लावून सुकलेल्या बागांमधील झाडे उपटली आहेत. सरकारने याची गंभीर दखल घेऊन सुकलेल्या झाडांचे त्वरित पंचनामे करावेत, तसेच फळबागासाठी हेक्‍टरी 80 हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे

आपली प्रतिक्रिया द्या