उपराजधानीत स्वाईन फ्लू फोफावतोय

प्रातिनिधिक

सामना प्रतिनिधी । नागपूर

महाराष्ट्राच्या उपराधीमध्ये स्वाईन फ्लूने हात-पाय पसरवायला सुरुवात केली आहे. ऐन सण-उत्सवांच्या कालावधीत शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात स्वाईन फ्लूवर उपचार घेत असलेल्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. राखी तांबोळी, भरत जायले आणि जया रक्षे अशी मृतांची नावे आहेत. तसेच शहरात आणखी १३ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये नागपूरमध्ये स्वाईन फ्लूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून आले आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत १६ जणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. नागपूर विभागात वर्षभरात आतापर्यंत १८४ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी स्वाइन फ्लूने दगावलेल्यांचा आकडा आता ४३ वर जाऊन पोहोचला आहे.