आगीत खाक झालेली ‘सिडनेहॅम’ची लायब्ररी झाली हायटेक!

सामना प्रतिनिधी । मुंबई

गेल्या वर्षी २४ डिसेंबरला लागलेल्या आगीत जळून खाक झालेली सिडनेहॅम कॉलेजची लायब्ररी आता नव्याने अद्ययावत करण्यात आली आहे. यासाठी दोन कोटींचा खर्च करण्यात आला असून जळालेल्या १५ हजार पुस्तकांपैकी ८० टक्के पुस्तकांची खरेदी करण्यात आली आहे. या कामासाठी माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेनेही सहकार्य केले आहे.

चर्चगेट येथील सिडनेहॅम इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, रिसर्च ऍण्ड एज्युकेशनच्या इमारतीला गेल्या वर्षी शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कॉलेजची लायब्ररी जळून खाक झाली होती. या आगीत महत्त्वाच्या दस्तावेजांसह तब्बल १५ हजारांवर पुस्तके जळाली. या आगीमुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर लायब्ररीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले होते. नव्याने बांधण्यात आलेल्या लायब्ररीत विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लायब्ररीसाठी आणखी पुस्तकांची खरेदी सुरू असल्याचेही कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आले. या नव्या लायब्ररीचे उद्घाटन लवकरच होणार आहे. त्यानंतर सध्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरती व्यवस्था केलेली लायब्ररी नव्या वास्तूमध्ये स्थलांतरित करण्यात येईल.

विद्यार्थी-युवा संशोधकांना लाभ मिळणार
नव्याने सुरू करण्यात येणारी लायब्ररी किद्यार्थी आणि युका संशोधकांसाठी खुली करून देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली. यामध्ये रिसर्च स्कॉलर्ससाठी नव्याने रीडिंग रूम बांधण्यात आली आहे. याशिवाय लायब्ररीमध्ये विद्यार्थ्यांना इंटरनेटची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ई-बुकसाठी संस्थेने सुमारे दीड कोटी रुपये खर्च केला आहे.