युनोत हिंदुस्थानने पाकिस्तानला सुनावले

संयुक्त राष्ट्रे – दहशतवादाला पाठीशी घालणार्‍या पाकिस्तानचा हिंदुस्थानने संयुक्त राष्ट्र संघात समाचार घेतला. लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद या दहशतादी संघटना आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई करण्याची मागणी हिंदुस्थानचे युनोतील स्थायी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी सुरक्षा परिषदेकडे केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेवर प्रहार केला.

आपण जे पेराल, तेच उगवेल आणि तसेच फळ मिळेल, अशा कडक शब्दात अकबरुद्दीन यांनी पाकला सुनावले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेसमोर बोलताना हिंदुस्थानचे युनोतील स्थायी सदस्य अकबरुद्दीन म्हणाले, लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि त्यांना पाठिंबा देणार्‍यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करायला हवी. दहशतवादासमोर हार पत्करायची नाही, असा निश्‍चय आंतरराष्ट्रीय समुदायाने करायला हवा. तसेच अफगाणिस्तानात मागील दीड दशकानंतर जी संधी मिळाली आहे, ती निष्फळ जाणार नाही याची काळजी आपल्याला घेण्याची गरज असल्याचे अकबरुद्दीन म्हणाले.

अफगाणिस्तानात आम्हाला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानात हिंसा घडवणार्‍या दहशतवादी संघटनांना शेजारील देशात आश्रय मिळू नये, असे सांगत अकबरुद्दीन यांनी पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली. फार्सी शायर रुमी यांच्या कवितेचा संदर्भ देत अकबरुद्दीन म्हणाले, तुम जैसा बोओगे, वैसा ही काटोगे. पाकिस्तानकडे थोडेसे शहाणपण शिल्लक असेल तर आता फक्त शांतीचे बी पेरावे, असा सल्ला त्यांनी पाकिस्तानला दिला.