सीरियाचे ‘भविष्य’

सीरियाचे ‘भविष्य’ ठरविण्याचा अधिकार हा तेथील नागरिकांचा आहे. तो या बडय़ा राष्ट्रांना कोणी दिला? अमेरिकेने रासायनिक शस्त्रास्त्रांच्या कथित साठय़ावरून जे इराकमध्ये केले तेच सीरियामध्ये थेट रासायनिक हल्ले करून केले जात आहे. इराकचे ‘भविष्य’ वाचविण्याचा मुखवटा घालूनच अमेरिकेने हा तेलसमृद्ध देश बेचिराख केला. आता ‘भविष्य’ सुधारण्याचा आव आणत अमेरिका, रशियासह बडे देश सीरिया उद्ध्वस्त करीत आहेत.

सीरियातील इदलिब प्रांतातील शयखुन भागात बुधवारी झालेल्या हवाई हल्ल्याने सीरियामध्ये सुरू असलेली यादवी एका गंभीर आणि चिंताजनक वळणावर येऊन ठेपली आहे. कारण हा रासायनिक हल्ला होता. या हल्ल्यात १०० पेक्षा अधिक नागरिक ठार झाले. त्यात लहान मुलांची संख्या जास्त आहे. सीरियामधील सरकार आणि बंडखोर गट यांच्यातील यादवीने आतापर्यंत सुमारे  ३ लाख २० हजारपेक्षा लोकांनी जीव गमावला आहे. त्यापेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत. सीरियाई विस्थापितांच्या लोंढय़ांनी गेल्या वर्षी युरोपातील देशांमध्येही वादाचे प्रसंग उद्भवले होते. आयलान कुर्दी या सीरियन चिमुरडय़ाच्या पार्थिवाच्या छायाचित्राने दोन वर्षांपूर्वी संपूर्ण जगात सीरियातील यादवीबाबत संतापाची आणि त्यामुळे परागंदा व्हाव्या लागणाऱया विस्थापित कुटुंबांबद्दल करुणेची लहर पसरली होती. अर्थात, त्याचा परिणाम ना सीरियातील बशर-अल-असद राजवटीवर झाला, ना त्याविरुद्ध लढणाऱया विविध बंडखोर गटांवर झाला, ना या दोन्ही बाजूंना सर्व प्रकारचे सहकार्य करणाऱया अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया, चीन आदी बडय़ा देशांनी त्यांचे हल्ले थांबवले. किंबहुना, मागील तीन-चार वर्षांत सीरियावर

जाणीवपूर्वक रासायनिक हल्ले

केले गेले. बुधवारीही क्लोरिन गॅसच्या थर्मोबेरिक बॉम्बचा हल्ला शयखुन भागात करण्यात आला. मागील तीन वर्षांत अशा प्रकारचा हा किमान चौथा हल्ला आहे. चकमकी, बॉम्बवर्षाव हे तर नित्याचेच आहेत. त्यामुळे त्या देशातील तब्बल 40 लाख लोकांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे शरणार्थी म्हणून नोंदणी केली आहे. शिवाय 70 लाख लोकांवर राहते घर, गाव सोडून सुरक्षित ठिकाणी पलायन करण्याची वेळ आली आहे. म्हणजे सीरियाची निम्म्यापेक्षा अधिक लोकसंख्या आपले घरदार, कुटुंबे यांना पारखी झाली आहे. गंभीर बाब म्हणजे पलायन करणाऱयांमध्ये निम्म्याहून जास्त 19 वर्षांच्या आतील तरुण आहेत तर 11 वर्षांच्या आतील मुले  40 टक्के आहेत. यावरूनही सीरियाचे ‘भविष्य’ किती भयंकर आणि अंधकारमय आहे याची कल्पना येते. म्हणजे मृत्यूची टांगती तलवार सहन करीत देशात आला दिवस ढकलणे किंवा इतर देशांत विस्थापित निराश्रितांचे जिणे जगणे हेच सीरियाई नागरिकांचे सध्याचे विधिलिखित बनले आहे. पुन्हा हेच विधिलिखित बदलण्याच्या, उज्ज्वल वगैरे करण्याच्या बाता मारत त्या देशात अमानुष सत्तासंघर्ष सुरू आहे. सत्ताधारी आणि बंडखोरांशिवाय अमेरिका, रशिया, चीन, ब्रिटन आदी बडे देश या रक्तरंजित खेळात सहभागी आहेत. कारण इतर देशांच्या भवितव्याशी खेळण्याचा ठेकाच त्यांनी घेतला आहे. प्रत्येकाचा स्वार्थ वेगळा आहे आणि

त्यात उद्ध्वस्त होत आहे

ती त्या देशाची भावी पिढी. सीरियाच्या याच ‘भविष्या’चा विचार करण्यासाठी ब्रुसेल्समध्ये दोन दिवसांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. युरोपियन संघासोबत संयुक्त राष्ट्रसंघही त्यात सहभागी होणार आहे. मात्र त्याच्या तोंडावरच बुधवारचा रासायनिक हल्ला केला गेला. याआधीही अशाच एका परिषदेपूर्वी रशियन राजदूताची भरकार्यक्रमात हत्या करण्यात आली होती आणि सीरियाचे ‘भविष्य’ ठरविण्याच्या कथित जागतिक प्रयत्नांमध्ये कोलदांडा घालण्याचा प्रकार झाला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती झाली आहे. खरे तर सीरियाचे ‘भविष्य’ ठरविण्याचा अधिकार हा तेथील नागरिकांचा आहे. तो या बडय़ा राष्ट्रांना कोणी दिला? पुन्हा सत्ताधारी असद काय किंवा त्यांच्याविरोधातील बंडखोरांचे गट काय, बडय़ा राष्ट्रांच्या हातातील खेळणीच आहेत. अमेरिकेने रासायनिक शस्त्रास्त्रांच्या कथित साठय़ावरून जे इराकमध्ये केले तेच सीरियामध्ये थेट रासायनिक हल्ले करून केले जात आहे. इराकचे ‘भविष्य’ वाचविण्याचा मुखवटा घालूनच अमेरिकेने हा तेलसमृद्ध देश बेचिराख केला. आता ‘भविष्य’ सुधारण्याचा आव आणत अमेरिका, रशियासह बडे देश सीरिया उद्ध्वस्त करीत आहेत.