हिंदुस्थानसाठी जिंकू किंवा मरू

सामना ऑनलाईन । थिरुअनंतपुरम

राजकोटची टी-२० लढत गमावणाऱ्या टीम इंडियाला आता आपली दिग्विजयी मालिका कायम राखण्यासाठी उद्या थिरुअनंतपुरम (केरळ) येथील तिसरा आणि अखेरचा टी-२० सामना जिंकावाच लागणार आहे. यजमान हिंदुस्थानी संघाला ही निर्णायक लढत जिंकण्यासाठी आपले सारे कौशल्य पणाला लावावे लागणार आहेत. कारण टी-२० त न्यूझीलंड संघाने यजमानांना जोरदार टक्कर देत १-१ अशी बरोबरी साधली आहे. उद्याची लढत ‘लहरी’ पावसाच्या मर्जीवरही अवलंबून असेल. कारण केरळच्या हवामान विभागाने उद्या शहरात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवून उभय संघांच्या आशांवर अनिश्चिततेचे सावट उभे केले आहे.

राजकोट टी-२० क्रिकेट लढतीत गोलंदाजांच्या कामगिरीवर हिंदुस्थानी क्षेत्ररक्षकांनी झेल सोडून पाणी फेरले आणि स्टार फलंदाजांनी ऐनवेळी हाराकिरी पत्करत किवींचा विजय सोपा केला. कर्णधार विराट कोहलीची (४२ चेंडूंत ६५ धावा) ही खेळीदेखील संघाचा पराभव टाळू शकली नाही. त्यामुळेच न्यूझीलंडने दुसरी टी-२० लढत ४० धावांनी जिंकून तीन लढतींच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.

‘फिनिशर’च्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला राजकोटमध्ये आपल्या फास्ट फिनिशिंग क्षमतेची किमया दाखवता आली नव्हती. ३७ चेंडूंत ४९ धावांची खेळी करणाऱ्या धोनीला राजकोट टी-२०त २३ धावा करण्यासाठी ३२ चेंडू खेळावे लागले. त्याचा हा खेळ संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे अनुभवी धोनीला कर्णधार विराट कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणार की संथ झालेल्या धोनीला संघाबाहेर ठेवून नव्या रक्ताच्या यष्टिरक्षकाला शेवटच्या लढतीत संधी देणार हे असे नानाविध प्रश्न हिंदुस्थानी क्रिकेट शौकिनांच्या मनात घर करून आहेत. धोनीला संधी मिळाल्यास या मालिकेत तो पुन्हा फिनिशरच्या भूमिकेत दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तिसरी टी-२० लढत
स्थळ : थिरुअनंतपुरम (केरळ)
वेळ : सायं. ७ वाजल्यापासून