सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा; महाराष्ट्र-कर्नाटकमध्ये  आज किताबी झुंज

सामना प्रतिनिधी । इंदूर

सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आलाय. उद्या, 14 मार्चला महाराष्ट्र आणि कर्नाटक या शेजारील संघांमध्ये या स्पर्धेची किताबी झुंज रंगणार आहे. उभय संघांनी सुपर लीग फेरीत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे अंतिम लढतीत कोण बाजी मारणार याकडे तमाम क्रिकेटशौकिनांच्या नजरा लागलेल्या असतील.

सांघिक खेळ ही  महाराष्ट्राची ताकद

महाराष्ट्राने कोणा एका खेळाडूच्या जिवावर नव्हे तर सांघिक कामगिरीच्या जोरावर स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंतच प्रवास केला आहे. अंकित बावणे, यष्टिरक्षक फलंदाज निखिल नाईक व नौशाद शेखची अष्टपैलू कामगिरी यांनी महाराष्ट्राला विजयामागून विजय मिळवून दिले. आता कर्नाटकच्या गोलंदाजीचा हे फलंदाज कसा सामना करतात यावर बरेच काही अवलंबून असेल. समद फल्लाह व डॉमिनिक जोसेफ या अनुभवी गोलंदाजावर महाराष्ट्राची मदार असेल. शिवाय सत्यजित बछावही सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

कर्नाटककडे मयांक अग्रवाल, करुण नायर व मनीष पांडे असे स्टार खेळाडू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचा उद्या खर्‍या अर्थाने कस लागणार आहे. बी. आर. शरत आणि फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर रोहद कदम यांना रोखण्यासाठी महाराष्ट्राच्या गोलंदाजांना रणनीती आखावी लागणार आहे. गोलंदाजीमध्ये विनय कुमार व व्ही. कौशिक यांच्यावर कर्नाटकची मदार असेल.

‘सर्वच खेळाडू फॉर्ममध्ये असणे ही आमची जमेची बाजू होय. अंतिम लढतीत खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी अतूर झाले आहेत. संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. उद्या कामगिरीत सातत्य राखण्याच्या इराद्याने आमचे खेळाडू मैदानावर उतरतील.’  –  सुरेंद्र भावे (प्रशिक्षक, महाराष्ट्र)