तापसी पन्नुचा अपघात की खराखुरा वाटणारा मेकअप? चाहते पडले गोंधळात

78

सामना ऑनलाईन । मुंबई

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तापसी पन्नु चांगलीच चर्चेत आली आहे. अनेक चाहते तिला लवकर बरी हो अशा सदिच्छा देत आहेत. त्याला कारणही तसंच आहे. तिने केलेल्या एका पोस्टवरून तिला अपघात झाल्याचा समज झाल्याने अनेकांनी तिला गेट वेल सून म्हणायला सुरुवात केली होती. मात्र, तिच्या दुसऱ्या पोस्टवरून अपघात नव्हे तर मेकअपची कमाल असल्याचं वाटतंय. त्यामुळे चाहते गोंधळात पडले आहेत.

त्याचं झालं असं की, तापसीने 9 जून रोजी एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर झालेल्या या पोस्टमध्ये तिचा डावा हात होरपळल्याचं आणि तिच्या दोन्ही पायांना प्लास्टर असल्याचं दिसत होतं. त्याखाली तिने एक भन्नाट कॅप्शनही दिली होती. कारण मला शिफॉन साडी नेसून बर्फाळ प्रदेशात 25 शूट करणं आणखी कठीण वाटतं, अशी कॅप्शन तिने या फोटोखाली दिली होती. त्यावर चाहत्यांनी तिला लवकर बरी हो अशा सदिच्छाही दिल्या होत्या.

पण, त्यानंतरच्या तिच्या एका पोस्टवरून हा अपघात नसून मेकअप असल्याचं वाटतंय. कारण, तिने एका प्रोस्थेटिक मेकअप आर्टिस्टसोबतचा फोटो टाकला आहे. त्यात ती तिचा होरपळ्यासारखा दिसणारा डावा हातही दाखवतेय. त्यामुळे हा अपघात आहे की मेकअप अशा घोळात तिचे चाहते पडले आहेत. तिच्या आगामी गेम ओव्हर या चित्रपटासाठी केलेला हा मेकअप आहे. त्यामुळे चाहते गोंधळात पडले असतील तर ती मेकअपची कमालच म्हणायला हवी.

आपली प्रतिक्रिया द्या