तालसाधना

>>प्रतिनिधी

प्रफुल्ला डहाणूकर यांचा नातू केशवा याला लहानपणापासूनच तबलावादनाचे वेड आहे.

आजच्या तरुणांच्या डोक्यात हवा जाते म्हणतात… पण फक्त १५ वर्षांचा उत्कृष्ट तबलावादक असूनही केशवा याच्या डोक्यात हवा तर सोडाच, त्याच्या मनात साधा गर्वही नाही. तबलावादनात आपण अजूनही नवीनच असून जेथून नवनवीन ताल ऐकायला मिळतील ते ऐकून आपण नेहमी शिकतच राहणार असं तो विनयाने सांगतो. प्रसिद्ध चित्रकार दिवंगत प्रफुल्ला डहाणूकर यांचा नातू आणि गोपिका कार्तिकेयान यांचा मुलगा केशवा अगदी लहानपणापासूनच तबला भन्नाट वाजवतो. कालच मंगळवारी ज्येष्ठ तबलानवाज उस्ताद शफात अहमद खान यांना मानवंदना देण्यासाठी केशवा याने दादरच्या वीर सावरकर सभागृहात सोलो तबलावादन केले. यावेळी त्याची बहीण कौशिकी हिने गायन केले.

केशवा १८ महिन्यांचा होता तेव्हा त्याच्या आजीने टेबलावर ताल धरला की तोही ताल धरायचा. वर्षा-दीड वर्षांचा मुलगा हुबेहूब ताल धरतो हे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटायचं. म्हणून मग तो दोन वर्षांचा झाल्यावर आजी प्रफुल्ला डहाणूकर यांनी त्याला तबला घेऊन दिला. याच्या हातात ताल आहे हे आजीला तेव्हाच कळलं होतं. दोन वर्षांच्या केशवाच्या हातात तबला मिळाला आणि मग त्याने मागे वळून पाहिलंच नाही. १८ महिन्यांचा केशवा तबल्याकडे बघतो आहे असे फोटोही आहेत.

केशवाला तबलावादनाच्या खूप ऑफर्स येतात. पण सध्या त्याचे शिक्षण सुरू असल्याने तो त्या स्वीकारत नाही. ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखा साहेब आणि उस्ताद झाकिर हुसेन यांनीही त्याचे कौतुक केलं. ते म्हणाले होते की, जे शिकायला मला तीन वर्षे लागली ते केशवा फक्त तीन महिन्यांत शिकला. हे सर्व तबल्याविषयी प्रचंड आवड असल्यामुळेच होते. त्याची आई पाँडेचरीमध्ये संगीत शिकवायची. सर्व कुटुंबच कलाक्षेत्रात वावरत असल्यामुळे केशवालाही कलेच्या क्षेत्रात चांगला प्रवास करता आला.

कॉमनवेल्थमध्ये जुगलबंदी

चेन्नईमध्ये त्याला २०१० मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचा प्रारंभ केशवाच्या तबलावादनाने झाले होते. तेव्हा तो फक्त ७ वर्षांचा होता. त्यावेळी त्याने २ हजार तबलावादकांशी जुगलबंदी केली होती. तबला वाजवताना केशवाचे हात तेव्हा लहान होते. पण मोठा झाल्यावर त्याने आपण फक्त तबलाच शिकणार असं जाहीर करून टाकलं. मग पं. अरूप चटोपाध्याय यांच्याकडे तबलावादनाला सुरुवात केली. त्यानंतर पं. शंकर घोष यांच्याकडे तो शिकला. पाँडेचेरीमध्ये केशवाचे बालपण गेले. तेथे शाळेतही तबला वाजवायचा.