तबला माझा देव

नादब्रह्मातूनच परमेश्वराची अनुभूती होते. सांगताहेत प्रसिद्ध तबलावादक पं. विजय घाटे.

देव म्हणजे ?
देव ही अशी शक्ती की, जिची आठवण काढली, त्याच्यावर प्रेम केलं, श्रद्धा ठेवली की, आपलं आयुष्य सदसद्विवेकबुद्धीने व्यवस्थित सुरू राहतं.

आवडते दैवत ?
मला आयुष्यात माझा देव तबल्याच्या रुपात दिसला. ‘तबला’ हेच माझं अधिष्ठान आहे. मला आता फक्त तबल्याची पूजा करायची आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवायची आहे.

धार्मिक स्थळ ?
जिथे अत्यंत सुरेल आणि सुंदर संगीत, शंख, तानपुरा, स्वर, लय यांचा नाद सुरू आहे, कुठलाही नाद हे ब्रह्म आहे. हे सगळ्यात मोठं देवालय आहे.

आवडती प्रार्थना
सगळ्यात आवडती प्रार्थना रोजचा रियाज हीच आहे.

धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का ?
तबल्याची माहिती असणारे ग्रंथच माझ्यासाठी धार्मिक ग्रंथ आहेत. सध्या मी तबल्याचा उगम कधी झाला याविषयीचं पुस्तक वाचतोय.

देवभक्त असावं, पण देवभोळं नसावं…तुमचं मत काय ?
मला तर वाटतं देवभोळंच असावं. कारण त्या देवभोळेपणातच भक्ती आणि देव आहे. निरागसपणा आपण हरवत चाललोय. तोच देव आहे.

ज्योतिषशास्त्रावर कितपत विश्वास आहे ?
कुणी हात बघितला, की खूप आवडतं. कारण मी मनुष्य आहे, तरीही माझा विश्वास कर्मावर आहे.

कला आणि भक्तीची सांगड कशी घालता ?
भक्तीशिवाय कला होऊच शकत नाही. भक्ती म्हणजे शरणागती. जेव्हा कोणापुढेही शरण होता तेव्हा तुमचे तर्कवितर्क बाजूला ठेवावेच लागतात. भक्ती आणि श्रद्धा हा कलेचा अविभाज्य भाग आहे.

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का ?
संपूर्ण श्रद्धा दैवी चमत्काराचा प्रत्यय देण्याचा मार्ग आहे.

अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं ?
खरं समाधान स्वतःसाठी मनापासून रियाज करतो तेव्हा मिळतं.

दुःखी असता तेव्हा ?
शक्यतो मी कधी निराश नसतो, आयुष्यातील चढउतार स्वीकारून पुढे जातो.