अरण्य वाचन…ताडोबा देवाच्या अंगणात

अनंत सोनवणे,[email protected]

ताडोबा म्हणजे वाघ… हे समीकरण बरोबर असले तरी ताडोबा अभयारण्यात खूप काही पाहण्यासारखं आहे.

ताडोबा म्हणजे माझं पहिलं प्रेम! माझ्या जंगल भ्रमंतीचा श्रीगणेशा ताडोबापासून झाला. जंगलाचा कोणताही पूर्वानुभव आणि अनुभवी व्यक्तीची सोबत नसताना मी व माझी पत्नी सुरेखा ताडोबामध्ये जाऊन थडकलो. ताडोबा तलावाकाठच्या वन विभागाच्या विश्रामगृहात आमचा मुक्काम होता. विश्रामगृहाच्या व्हरांडय़ात बसलं की समोर विस्तीर्ण जलाशय दिसायचा. काठावर सावधपणे चरणारी हरणं आणि सांबरं, अवचित भेट देऊन जाणारा एखादा रानगवा, तोंड उघडून मस्त ऊन खात बसलेली एखादी मगर, काठाकाठानं सुरू असलेली बदकं, बगळे, करकोचे इत्यादी पाणपक्ष्यांची लगबग, सावजाच्या प्रतीक्षेत फांदीवर दबा धरून बसलेला एखादा ऐटबाज सर्पगरुड… त्या व्हरांडय़ातून झालेलं ताडोबाचं हे पहिलंवहिलं दर्शन! ताडोबावर प्रथमदर्शनी प्रेम नसतं बसलं तरच नवल!

ताडोबा हा स्थानिक आदिवासींचा देव. तलावाकाठीच त्याचं छोटंसं मंदिर आहे. ताडोबा तलावाभोवतालच्या ११७ चौ. कि.मी. परिसराला १९५५ साली राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. अंधारी नदीनं जोपासलेलं लगतचं जंगल १९७६ साली अंधारी वन्य जीव अभयारण्य म्हणून घोषित झालं. नंतर १९९५ मध्ये ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि अंधारी वन्य जीव अभयारण्याचा परिसर एकत्र करून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. २०१७ सालच्या गणनेनुसार इथं वाघांची संख्या ८५ च्या वर पोहचली असून हा प्रकल्प वाघांचं नंदनवन बनला आहे.

ज्या जंगलात वाघाचा निवास असतो ते जंगल परिपूर्ण मानलं जातं. कारण तिथं नैसर्गिक अन्नसाखळीतले सर्व पशुपक्षी, वनस्पती सुखेनैव नांदत असतात. इथं तर ताडोबा म्हणजेच वाघ असं समीकरण झालंय.

केवळ संख्यात्मक वाढ हे ताडोबाच्या वाघांचं एकमेव वैशिष्टय़ बिलकूल नाही तर इथल्या प्रत्येक वाघाला स्वतंत्र वैशिष्टय़पूर्ण व्यक्तिमत्त्व आहे. नाव आहे गब्बर, वाघडोह, शिवाजी, मटकासुर हे वाघ तसंच लीला, माया, सोनम या वाघिणींच्या कहाण्या दंतकथेसारख्या सांगितल्या-ऐकल्या जातात. मी स्वतः ‘वाघडोह’ला एका झेपेत डांबरी रस्ता ओलांडून रानकुत्र्यांशी संघर्ष करताना आणि त्यांनी मारलेलं सांबर हिसकावून नेताना पाहिलंय. माया आणि सोनमला बछडय़ांचं संगोपन करताना पाहिलंय. गेल्याच आठवडय़ात वनमजुराचं प्लॅस्टिकचं घमेलं पळवणाऱया मटकासुराचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. इथल्या वाघांच्या अशा अविरत करामतींनी ताडोबाचं जंगल नेहमी हॅपनिंग असतं.

दुर्दैवानं पर्यटक मात्र ‘अतिपरिचयात् अवज्ञा’ करू लागलेत. सेल्फी आणि छायाचित्रणाच्या नादात बहुतेकजण निसर्गाचा आनंद घेणंच विसरून जातात. जंगलाची शांतता भंग करणारा गोंगाट करतात. सुदैवाने आता ताडोबामध्ये खासगी वाहनांना बंदी आहे. पूर्वी पर्यटक वेगमर्यादेचं सर्रास उल्लंघन करताना दिसायचे. आताही वाघाला सर्व बाजूंनी घेरलेल्या पर्यटक जिप्सी वरचेवर पाहायला मिळतात. जंगलात प्लॅस्टिक व इतर कचरा टाकू नये हा साधा परंतु अत्यंत महत्त्वाचा नियमसुद्धा लोक पाळत नाहीत. मार्च २०१६ च्या ताडोबातल्या एका सफारीदरम्यान एका हरणाच्या तोंडाभोवती डायपर गुंडाळला गेल्याचं अत्यंत संतापजनक चित्र मला पाहायला मिळालं. अलीकडे उपद्रवी विमान प्रवाशांना हवाई प्रवासाची बंदी केली जाते तशी उपद्रवी वन पर्यटकांना जंगल प्रवेशाची बंदी करायला हवी. त्याशिवाय असे उद्दाम पर्यटक ताळय़ावर येणार नाहीत.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

प्रमुख आकर्षण…वाघ

जिल्हा…चंद्रपूर

राज्य…महाराष्ट्र

क्षेत्रफळ…१७०० चौ. कि.मी.

निर्मिती…१९९५

जवळचे रेल्वे स्थानक…चंद्रपूर

जवळचे विमानतळ…नागपूर

 निवासव्यवस्था…एम.टी.डी.सी. विश्रामगृह, अनेक खासगी विश्रामगृह.

सर्वाधिक योग्य हंगाम…मार्च ते जून

सुट्टीचा काळ…१ जुलै ते १५ ऑक्टोबर.

सुट्टीचा दिवस…नाही.