वीज पुरवठा खंडीत झाल्याने शहर अंधारात, मंत्र्याने दिला राजीनामा

सामना ऑनलाईन, तैपे

तैवानची राजधानी तैपेचा वीजपुरवठा भर उन्हाळ्यात खंडीत झाल्याने नागरीकांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागत तैवानच्या मंत्र्याने राजीनामा दिला असून हलगर्जीचा ठपका ठेवत वीजनिर्मिती केंद्राच्या प्रमुखाला सक्तीच्या रजेवर पाठवले आहे.

सद्द्या तैवानमध्ये प्रचंड उकाडा आहे. नागरीकांचे उष्माघाताने बळी जात असून तापमान चाळीशी पार झाले आहे. त्यातच मंगळवारी नैसर्गिक वायूवर वीज निर्मिती करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला. शहर अंधारात बुडाले. रस्ते, शॉपिंग मॉल, वाहतुक, कार्यालये ठप्प झाली. संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले.

शहराचे पालक आणि अर्थपुरवठा मंत्री ली चिह कुंग यांनी नागरीकांना झालेल्या गैरसोयीबाबत दिलगिरी व्यक्त करीत घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. वीजनिर्मिती केंद्राच्या प्रमुखाला सक्तीच्या रजेवर पाठवले असून या घटनेची जबाबदारी स्वीकारत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.