‘मोस्ट फेवर्ड नेशन’ दर्जा म्हणजे काय?

<<राहुल लोखंडे>>

हिंदुस्थानी सरकारने पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा अखेर काढून घेतला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून राष्ट्रप्रेमी संघटनांनी पाकिस्तानला दिलेला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा परत घ्यावा अशी मागणी केली होती. पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात 42 जवान शहीद झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर पाकिस्तानला दिलेला हा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हिंदुस्थानने 1 जानेवारी 1996 रोजी तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांच्या काळात पाकिस्तानला हा दर्जा दिला. हा दर्जा मिळणाऱ्या देशास म्हणजे पाकिस्तानला व्यापारात विशेष सवलती मिळतात. जसे की, किमान निर्यात शुल्क आणि विभिन्न व्यापारी करांमध्ये सूट. महत्वाची गोष्ट ही आहे की पाकिस्तानला हा दर्जा दिल्याने हिंदुस्थानला काहीच फायदा होत नव्हता. कारण हिंदुस्थानला हा दर्जा पाकिस्तानने दिला नाही. आयसीआरआयईआरच्या आकडेवारी नुसार 2013-2014 वर्षी हिंदुस्थान-पाकिस्तानमधील व्यापार ४.५ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला होता. या व्यापारामध्ये हिंदुस्थानऐवजी पाकिस्तानलाच जास्त फायदा झाला. हा दर्जा मिळाल्याने त्या देशाला हे नुकसान टाळण्यासाठी एक प्रकारे कवच प्राप्त होतं. या दर्जामुळे आपल्याला व्यापारात नुकसान होणार नाही याची खात्री मिळते. दोन देशांमध्ये जर सुरक्षेच्या कारणावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली तर हा दर्जा परत काढून घेतला जाऊ शकतो, नेमकं हेच हिंदुस्थानने केलं आहे.

२००० साली अमेरिकेने चीनला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा दिला, पण याचा अमेरिकेस विशेष लाभ झाला नाही. उलट चीनने अमेरिकेच्या बाजारपेठेत आपल्याकडील कमी किमतीची उत्पादने पाठवून धुमाकूळ घातला होता आणि अल्पावधीत आर्थिक प्रगतीकडे झेप घेतली. पाकिस्तानला होणारा विरोध वेगळ्या कारणासाठी आहे. त्यास पाकपुरस्कृत दहशतवादाच्या प्रश्नांची किनार आहे.

कितीही गहन विचार केला तरी पाकिस्तान हा हिंदुस्थानसाठी कोणत्या दृष्टीने ‘मोस्ट फेवर्ड नेशन’आहे हे कळत नव्हते. व्यापाराच्या माध्यमातून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील संबंध सुधारतील आणि पाकिस्तानला ‘दाम’च्या आधारे योग्य मार्गावर आणता येईल अशी भाबडी आशा हिंदुस्थानने बाळगली होती, मात्र ती फोल ठरली आहे. पाकिस्तानचा ‘उद्दाम’पणा मात्र पराकोटीचा वाढला आहे आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादही कमालीचा वाढला आहे. पाकिस्तानने अनेक वस्तूंसोबत दहशतवादाची निर्यातही हिंदुस्थानात सहज केली. त्यामुळेच हा दर्जा काढून घेतला जावा अशी मागणी सातत्याने केली जात होती. भाजपची सत्ता आल्यानंतर या मागणीने जोर धरला होता, मात्र ती पूर्ण होण्यासाठी 42 जवानांचे प्राण जाईपर्यंत वाट पहावी लागली.

पाकिस्तानने हिंदुस्थानवर चार युद्धे लादली, हजारो सैनिक शहीद झाले. कश्मीरमध्ये फुटीरतावादी आंदोलने आणि देशभरात दहशतवादी कारवायांमुळे हजारो निरपराध नागरिक मारले गेले आहेत आणि अजूनही हे सत्र चालू आहे. हिंदुस्थानात बनावट नोटा आणि अमली पदार्थांचा शिरकाव करणे अशा ‘नापाक’ चाली पाकिस्तान नेहमीच रचतो आणि त्यात यशस्वीही होतो. तरीही हिंदुस्थान पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चे बक्षीस देतो हे वेगळेच कोडे आहे. ही गोष्ट हिंदुस्थानच्या पाकिस्तानविरोधी आंतरराष्ट्रीय भूमिकेस छेद देते. यात आणखी एक गोष्ट अधोरेखित करावीशी वाटते. हिंदुस्थानी गुप्तचर संस्थांनी वेळोवेळी हे दाखवून दिले आहे की, पाकिस्तानातील अधिकाधिक मालकी सैन्याकडे आहे आणि पाकिस्तानी सैन्य अगदी साबणापासून तेल, कपडे, सिमेंट, सोने आदी व्यापारावर स्वतःचे नियंत्रण ठेवते. तेथील व्यापारी नफ्याचा मोठा हिस्सा सैन्याधिकारी स्वतःकडे ठेवतात. थोडक्यात, पाकिस्तानशी व्यापार ठेवणे म्हणजे पाकिस्तानी सैन्याला मदत केल्यासारखे आहे! याच ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ असलेल्या पाकिस्तानने मागे हिंदुस्थानास सडके कांदे पाठवून हिंदुस्थानी राज्यकर्त्यांना आरसा दाखवला होता. येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण येते. महाराजांनी मोगलांशी फारसे व्यापारी संबंध ठेवले नाहीत. इतकेच काय इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच यांच्याशीही व्यापारी संबंध ठेवताना त्यांचे व्यापारविषयक धोरण खूपच अभ्यासपूर्ण आहे. महाराज नेहमीच हिंदुस्थानी व्यापारी आणि शेतकरी, सामान्य जनता यांचे हित सर्वतोपरी जपत असत. त्यामुळे संबंधितांना उचित आर्थिक लाभ होत असे. महाराजांना कधी कोणाला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा दर्जा देण्याची गरज भासली नाही. छत्रपती शिवरायांनी सुरत जी मोघल साम्राज्याची प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. ती दोनदा लुटली. आपल्या सरकारला लाहोर, कराची लुटता नाही आली तरी चालेल, पण पाकिस्तानला व्यापारात ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ची खिरापत तरी वाटू नका असं वारंवार सांगितलं जात होतं.