‘त्या’ वेदना दूर करा!

सामना ऑनलाईन । मुंबई

महिलांना मासिक पाळी चुकलेली नाही. मासिक पाळी आली की, पोटदुखी आणि थकव्याने त्यांच्यात एक प्रकारचा चिडचिडेपणा येतो. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास महिलांसाठी गंभीर समस्या आहे. अशावेळी कामावर जाणाऱया महिलांना मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा हा त्रास नकोसा वाटतो, अशावेळी पेनकिलर घेणे त्यांना सोयिस्कर वाटते. पण घरगुती उपचारानेही हा त्रास कमी करता येतो.

मासिक पाळी ही स्त्रीयांसाठी मिळालेले एक वरदान आहे, पण पाळीदरम्यान होणारा त्रास अनेकदा नकोसा वाटतो. त्यामुळे मासिक पाळीच्या दरम्यान शाळा, कॉलेज आणि कामाचे खाडे होतात. दिवसांमधील वेदना कमी करण्यासाठी रताळी खायला हवीत. रताळ्यामध्ये असलेले अॅन्टीस्पॅज्माडिक गुण वेदना सहन करण्यास मदत करतात. तसेच या दिवसांमध्ये एक ग्लास दुधाचा समावेश करा. यातील कॅल्शियममुळे पोटदुखी कमी होते. तसेच पाळीच्या दिवसांत पपई खाल्ल्याने होणारा प्रवाह नियंत्रित होतो. गाजर खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या कमी होतातच, पण त्याबरोबर पाळीदरम्यान गाजराचा रस घेतल्यास आराम मिळतो. कोरफडीचा रस मधासोबत घेतल्यास होणाऱया वेदनांपासून आराम मिळतो. मासिक पाळी आली असेल तर त्या दिवसांत मांस आणि कॅफिनपासून दूर रहा. जास्त वेदना जाणवणार नाहीत.

आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करा. पोट आणि पाठीला गरम पाण्याचा शेक बसल्यास आराम मिळतो. तसेच शक्य असेल तर पोटावर लॅव्हेंडर ऑइल लावा. त्यामुळे पोटदुखी आणि स्नायूंवरील ताण कमी होतो. या दिवसांत शक्य तेवढा आराम करा.