हिंमत असेल तर आता मध्यावधी घ्या, उद्धव ठाकरेंचे ‘भाजप’ला जबरदस्त आव्हान

सामना ऑनलाईन, मुंबई

‘‘अरे, मध्यावधी निवडणुकीची धमकी कसली देताय! हिंमत असेल तर आताच घ्या मध्यावधी. तुम्हाला महाराष्ट्राच्या मातीतच गाडून तुमच्या छाताडावर शिवरायांचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही.’’ असे जबरदस्त आव्हान आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले. मध्यावधी लागल्या तर माझा प्रत्येक शिवसैनिक ठिणगी नव्हे तर वणव्यासारखा पेटून उठेल आणि २०१४ मध्ये जे हुकलं ते मिळवूनच दाखवेल असे बजावतानाच प्रत्येक निवडणूक आम्हीच जिंकू असे तुम्ही समजू नका. आता दिवस बदललेत. शेतकरी जागा झाला आहे हे लक्षात ठेवा, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.

शिवसेनेचा 51वा वर्धापन दिन सोहळा आज षण्मुखानंद सभागृहात परंपरेप्रमाणे आणि प्रचंड… प्रचंड गर्दीत साजरा झाला. सर्वत्र डौलाने फडकणारे भगवे झेंडे आणि ‘शिवसेना झिंदाबाद’चा जयघोष यामुळे अवघे वातावरणच जणू भगवेमय झाले होते. षण्मुखानंद सभागृहाचा कोपरा न् कोपरा व्यापलेल्या गर्दीला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजपचा चांगलाच समाचार घेतला.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही ‘मध्यावधी’ची भाषा केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या या धमकीची सालटीच काढली. ते म्हणाले, ‘‘मित्र म्हणून आम्ही जीवापाड मैत्री जपू, पण पाठीत वार कराल तर उलटून छाताडावर वार केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा!’’

दलितांची मते घेण्यासाठी दलित राष्ट्रपती?

राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपने आज रामनाथ कोविंद या दलित नेत्याचे नाव जाहीर केले. भाजपच्या या मतांच्या राजकारणाची चिरफाड करताना उद्धव ठाकरे बरसले. ते म्हणाले, शिवसेनेने आडून, पाठीमागून राजकारण कधीच केले नाही. जे केले ते तोंडावर, स्पष्टपणे. हिंदुस्थान हे हिंदुराष्ट्रच आहे. ते म्हणायला लाज कसली, भीती कसली असे शिवसेनाप्रमुख सांगायचे. पण भाजपने काय केले? राज्यातील मतांप्रमाणे गोवंश हत्याबंदी कायदा करता? कश्मीर पेटलाय, अरुणाचलमध्ये चीन शिरलाय, सर्वत्र अस्वस्थता आहे तर स्वतंत्र गोरखालॅण्डनेही डोके वर काढलेय. यावर कुणीच काही बोलत नाही. आणि हे सगळे सुरू असतानाच राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची धांदल सुरू आहे. दलित समाजाची मते घेण्यासाठी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून दलित नेता पुढे करायचा! अरे, मतांचे राजकारण पक्षाला जिंकून देत असेल कदाचित, पण असले राजकारण देशाला रसातळाला घेऊन जाते हे लक्षात ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला बजावले.

शिवसेनेचा निर्णय उद्या

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना काय करणार याचा निर्णय उद्या घेणार आहोत. उद्या त्यासाठीच शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या संपात सदेह उभा आहे!

सत्तेत असूनही तुम्ही विरोधकांची भूमिका का घेता, असे अनेकजण विचारतात. पण शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्यासाठी सत्तेत असलो काय किंवा नसलो काय, प्रश्नच येतोच कुठे? मुख्यमंत्री म्हणतात, शेतकरी संपात राजकीय पक्षांचा हात आहे… अहो, शेतकऱ्यांच्या संपात शिवसेनेचा हातच नाही, तर आम्ही सदेह त्यांच्या पाठीशी उभे आहोत हे मी जाहीरपणे सांगतो. (टाळ्या) जोपर्यंत माझा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत सरकारची बकोटी मी सोडणार नाही. (प्रचंड टाळ्या) कुठल्या तरी अटीतटी घालून शेतकऱयांना घाबरवून टाकणार असाल तर तो कागद पहिल्यांदा मी फाडून टाकेन. जे काही द्यायचे असेल ते मोकळ्या मनाने द्या, असेही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला बजावले.

 

 

  • pankaj shinde

    लालूंच्या पोरांच्या मागे आयबी लावली आहे ..आता यांची बारी आहे ……मध्यवर्ती लागली तर शिवसेना संपेल ….जागा हो बाबा …..