पहिल्या व्होटिंगचा सेल्फी घ्या; बक्षीस मिळवा

2

सामना ऑनलाईन । मुंबई

मुंबई शहर जिल्हय़ातील मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासन कार्यरत असून त्याचाच एक भाग म्हणून ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ हा नवमतदारांना प्रोत्साहन देण्यासाठीचा अभिनव उपक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून राबवण्यात येत आहे.

मुंबई शहरात 18 ते 19 वर्षे वयोगटातील 18 हजार मतदारांची नोंद झाली आहे. जिल्हय़ात धारावी-सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी व कुलाबा असे 10 विधानसभा मतदार संघ आहेत. यातील हे नवमतदार असून त्यांनी लोकसभा निवडणुकीत 29 तारखेला 100 टक्के मतदानाचा हक्क बजावणे अपेक्षित आहे. या नवमतदारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून उपरोक्त उपक्रम व स्पर्धा घेतली असल्याची माहिती मुंबई जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.

सर्वांना मिळणार सहभाग प्रमाणपत्र

साधारणतः प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून 10, याप्रमाणे 100 नवमतदारांची अंतिम निवड केली जाईल. त्यात युवक, युवतीचे प्रमाण 50 टक्के असेल. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला प्रोत्साहन म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे स्वाक्षरी असलेले सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. या निवडलेल्या 100 नवमतदारांना विधानसभा-2019साठी मुंबई शहर जिल्हय़ाचे युवा मतदार दूत म्हणून नेमले जाईल. त्यांना पुढील स्विपच्या कार्यक्रमात सहभागी करून घेतले जाईल. त्यातून 10 युवा मतदारांचा त्यांच्या महाविद्यालयात/भागात स्टँडीज उभारून सन्मान केला जाईल. विधानसभा निवडणुकीच्या काळात या युवा दूतांच्या मार्फत नवमतदारांची अधिक नोंदणी कशी होईल हे पाहिले जाईल. तरी मोठय़ा प्रमाणात नवमतदारांनी ‘माय फर्स्ट व्होट सेल्फी’ या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुंबई जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केले आहे.

असे असेल स्पर्धेचे स्वरूप

साधारणतः माय फर्स्ट व्होट सेल्फी स्पर्धेचे स्वरूप असे असेल. मुंबईतील मतदानाच्या दिवशी म्हणजे सोमवारी 29 एप्रिलला सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ही स्पर्धा असेल. युवा मतदाराने मतदान केल्यानंतर मतदान केद्रांच्या विहीत 100 मीटर मर्यादेच्या बाहेर येऊन आपली सेल्फी काढावी व ती जिल्हा निवडणूक यंत्रणेच्या ई-मेल अथवा 9372830071 या व्हॉट्सऍपवर पाठवावी. ही सेल्फी पाठवाताना त्यांनी स्पर्धेत सहभागाची नोंद करून आपले छायाचित्र व माहिती द्यावी. त्यात नाव, आडनाव, विधानसभा मतदार संघाचे नाव/नवमतदाराचे नाव/ईपीक नंबर किंवा मतदार यादी भाग क्रमांक व मतदार यादीतील अनुक्रमांक असावा.