अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई ८ नोव्हेंबरपासून

सामना ऑनलाईन । नाशिक

रस्त्यालगत असलेली शहरातील दीडशे अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई येत्या ८ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. दरम्यान, ही कारवाई थांबवावी यासाठी पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर यांनी दिली.

सन २००९ पूर्वीची असलेली अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या नोटिसा महापालिकेने दिल्या होत्या, त्याची मुदत मंगळवारी, ३१ ऑक्टोबरला संपली. महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली आज यासंदर्भात बैठक झाली. महापालिकेने पोलीस बंदोबस्तात येत्या ८ नोव्हेंबरपासून ही अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही कारवाई थांबविण्यासाठी यापूर्वी शिवसेना नगरसेवक दिलीप दातीर व भागवत आरोटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, तेव्हा नोटिसा रद्द करण्यात आल्या होत्या. आता महापालिकेने पुन्हा कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे, त्याविरुद्ध पुन्हा उच्च न्यायालयात जाणार असल्याचे दिलीप दातीर यांनी सांगितले. धार्मिक स्थळांना चुकीच्या पद्धतीने नोटिसा देण्यात आल्या आहेत, उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार त्या देण्यात आलेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले, महापालिका आयुक्तांना निवेदन देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.