आपल्या माणसांची काळजी घ्या!

सामना प्रतिनिधी । मुंबई

लहान असताना मुलाला बोट धरून चालवणाऱया मातापित्यांना वृद्धपणी याच मुलांची गरज असताना सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे महाभाग बरेच भेटतात. आईवडील कसेही असले तरी म्हातारपणी मुलांनी त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. तरी म्हातारपणी पालक नकोसे होतात. अशा ज्येष्ठ नागरिकांनी काय करायचं हा प्रश्न उरतोच. आपल्या वृद्ध आई-वडिलांना न सांभाळणाऱया मुलांवर यापुढे कडक कारवाई करण्यात येईल. प्रसंगी त्यांना तुरुंगाची हवाही खावी लागेल असा बडगा नुकताच मध्य प्रदेशात उगारला आहे. त्यांचा हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून याबाबत त्यांच्या सरकारने कायदा केला तर अन्य राज्यांमध्येही तो ज्येष्ठांना फायद्याचा ठरेल.

मुळात आजचे जीवन धकाधकीचे झाले आहे हे खरेच.. कामाच्या व्यापाने मुले पिचलेली असतात. पण अशा स्थितीतही त्यांनी आईवडिलांना मायेचा हात देण्याची खरी गरज असते. ज्येष्ठांना मुलांनी नीट सांभाळले पाहिजे. याबाबत ठोस असा कायदा नसला तरी या वृद्धांसाठी सध्या असलेले कायदे, नियम यांचीही नीट अंमलबजावणी व्हायला हवी. बरेच ज्येष्ठ नागरिक बरीच वर्षे स्वतःची काळजी स्वतःच घेत असतात. पण त्यानंतर त्यांना ते शक्य होत नाही. अशावेळी कुटुंबाने एकत्र येऊन त्यांना झेपेल अशी मदत कशी पुरवता येईल याचा विचार करत सर्वांनी भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या पाहिजेत आणि व्यावहारिकरीत्या त्यावर तोडगा शोधला पाहिजे.

आपल्या प्रेमाची माणसं

आईवडील ही आपली प्रेमाची माणसं असतात. कोणतंही संकट उभं राहिलं तर सर्वात पहिल्यांदा तेच आपल्यामागे पहाडासारखे उभे राहातात. संकटे आली की ‘घाबरू नकोस. मी आहे ना…’ असे बोलणारे वडील किंवा आईच असते. असे असताना काही मुले त्याच आईबाबांना कसे दूर लोटू शकतात? आज गरज आहे म्हणून नव्हे, तर मुलांना गरज असतानाही तेच आईबाबा मुलांना सावरायला हात पुढे करतात. त्यामुळे पालकांच्या म्हातारपणी त्यांना मदतीचा हात देण्याचं काम मुलांचं आहेच. आईवडिलांना दूर लोटणाऱया मुलांनी त्यांनी आपल्या लहानपणी आपल्यावर किती प्रेम केलं ते आठवून त्यांना वेळोवेळी मदतच केली पाहिजे.

आईबाबांसाठी वाट्टेल ते

ठरावीक वयानंतर आईबाबांना नेहमीच्या गोष्टी करणंही शक्य होत नाही. अशावेळी मुलांनी त्यांना नेमकी कोणती सुविधा पुरवली म्हणजे त्यांचे काम हलके होईल हे जाणून त्या त्या सुविधा त्यांना पुरविण्याचा प्रयत्न मुलांनी करायचा. आईबाबांना घरात चाला-फिरायला, अंघोळ व इतर गोष्टी करायला आपली काय मदत होऊ शकते याचा विचार मुलांनी केला पाहिजे. आईबाबांसाठी मुलांनी त्यांचे वकील, सेक्रेटरी, ड्रायव्हर, हरकाम्या अशा कोणत्याही भूमिका बजावायला हव्यात. बऱयाचदा पालकांचे काम करायला एखादी बाई ठेवली की आपले काम संपले असा चुकीचा ग्रह काही मुले करून घेतात. वास्तविक ज्येष्ठ नागरीकांना एकटे राहायला आवडत नसते. त्यांना चोवीस तास कधीही मदतीची गरज लागते. ही सेवा दिसत नसली तरी एखादा मुलगाच ती करू शकतो.