जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला तलाठी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

84

सामना प्रतिनिधी । परभणी

पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात गोदावरी नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी जात असताना जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांच्या अंगावर वसमत तालुक्यातील रिधोरा सज्जचा तलाठी धावून गेल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास घडली. याप्रकरणी पूर्णा पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे ४.३० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी धडाका लावला आहे. या अनुषंगाने पूर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रविवारी रात्री जात होते. मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास (एम.एच. 22 ए.आर. 2207) या मोटारसायकलवर खंडू बाबुराव पुजारी (तलाठी, रिधोरा, ता. वसमत) हा जिल्हाधिकाऱ्यांच्या कारच्या पाठीमागे येत होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी वाहन थांबवून सदरील व्यक्तीची चौकशी करण्यास सोबतच्या सुरक्षा रक्षकास सांगितले व जिल्हाधिकारी वाहनातून खाली उतरले. यावेळी सुरक्षा रक्षकाने सदरील व्यक्तीच्या चेहऱ्यावर बॅटरीचा प्रकाश मारला असता, कोण आहे रे तुम्ही म्हणून खंडू पुजारी हा जिल्हाधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला, त्याच वेळी त्यांच्या सुरक्षा रक्षकाने धाव घेत, त्याला पकडले व साहेब परभणीचे जिल्हाधिकारी आहेत, मी बॉडीगार्ड आहे, व सोबत इतर कर्मचारी असे सांगितले. त्यानंतर सदरील इसम पळून जात असताना सुरक्षा रक्षकाने त्यास पकडून पूर्णा पोलीस ठाण्यात आणले. याबाबत वाहन चालक नंदकिशोर शेलाटे यांच्या फिर्यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुजारी याने दारू पिल्याचे वाटत होते असेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या