तळोजा कारागृहात अधीक्षकाची पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण


सामना ऑनलाईन । नवी मुंबई

तळोजा मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांकडून कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी कारागृहातील पोलीस कर्मचारी मधुकर कांबळे यांना शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली आहे. कंट्रोल रूममधील फोन बराच वेळ व्यग्र ठेवल्याने अधीक्षक सदानंद गायकवाड यांनी सुरुवातीला फोनवरून शिवीगाळ केली व नंतर कारागृहामध्ये येऊन मारहाण केल्याची तक्रार पोलीस कर्मचारी मधुकर कांबळे यांनी खारघर पोलिसांकडे केली आहे. तसेच या प्रकरणी मुंबई विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक यांच्याकडे देखील तक्रार केली आहे.

कारागृहाच्या अधीक्षकांकडून तेथील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी खारघर पोलिसांनी बुधवारी तळोजा कारागृहात जाऊन मारहाण झालेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही फुटेज घेतले आहे. सोमवारी रात्री कारागृहातील हवालदार कांबळेंची कैद्यांच्या स्वयंपाक घरात ड्युटी होती. मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास कंट्रोल रूममध्ये त्यांच्या एका नातेवाइकाचा फोन आला होता. त्याच्याशी ते बोलत असताना, अधीक्षक गायकवाड फोन करीत होते परंतू फोन व्यग्र असल्याने लागत नव्हता.त्यामुळे अधिक्षकांनी पुन्हा फोन करून कांबळे यांना शीवीगाळ केली आणि थोड्या वेळाने नाइट राउंडसाठी आले असता पुन्हा शिवीगाळ करीत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली असा आरोप कांबळे यांनी केला आहे.

दरम्यान, वरिष्ट अधिकाऱ्याकडून मारहाण केल्यामुळे संतप्त झालेले कांबळे यांनी मंगळवारी विभागाचे कारागृहाचे उपमहानिरीक्षक राजवर्धन सिन्हा यांच्याकडे तक्रार दिली आहे. तसेच त्यांच्या सूचनेनुसार या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार देखील दाखल केली आहे. बुधवारी पोलीस अधिकाऱ्याच्या एका पथकाने या प्रकरणी कारागृहात चौकशी करत घटनेवेळी ड्युटीवर असलेल्या संबंधित अधिकारी, रक्षकांचे जबाब नोंदवले आहेत.