शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश, तळोजा एमआयडीसी-बदलापूर पाइपलाइन रस्ता होणार सुसाट

1

सामना प्रतिनिधी । ठाणे

शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला उत्कृष्ट पर्याय असलेल्या तळोजा एमआयडीसी-उसाटणे-बदलापूर पाइपलाइन हा दुर्दशा झालेला रस्ता लवकरच सुसाट होणार आहे. शिवसेनेच्या पाठपुराव्यानंतर एमएमआरडीएने या रस्त्याच्या कामास होकार दिला असून या कामाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेची मोहोर उमटताच या रस्ते कामाला तत्काळ सुरुवात होणार आहे.

शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्यावर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्यामुळे या रस्त्यांवर वारंवार वाहतूककोंडी होते. बदलापूर पाइपलाइन-उसाटणे-तळोजा एमआयडीसी हा रस्ता शीळ-कल्याण आणि शीळ-तळोजा रस्त्याला चांगला पर्याय असल्यामुळे त्या मार्गाचा वापरही मोठ्या प्रमाणावर होतो. मात्र गेल्या काही काळापासून या रस्त्याची दुर्दशा झाल्यामुळे त्याची दुरुस्ती करण्यासाठी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. एमएमआरडीएकडे याबाबत सातत्याने पाठपुरावा केला. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेही पत्राद्वारे मागणी केली होती. या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएने या रस्त्याचे काम करण्याची तयारी दर्शवली आहे. या रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार झाला असून मंजुरीसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केला असून त्यांची मंजुरी मिळताच या रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी ग्वाही एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी डॉ. शिंदे यांना दिली. कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसंदर्भात डॉ. शिंदे यांची मदान यांच्यासह महत्त्वाची बैठक झाली.

३०० कोटींच्या शहाड पुलाचे कामही मार्गी लागणार
या बैठकीत कल्याण-मुरबाड, कल्याण-बदलापूर आणि कल्याण-पुणे लिंक रोड या तीन महत्त्वाच्या रस्त्यांच्या जंक्शनवर (वाय जंक्शन) उड्डाणपूल करण्यासंदर्भातही चर्चा झाली. या उड्डाणपुलासाठीही डॉ. शिंदे कल्याण-डोंबिवली महापालिका आणि एमएमआरडीएकडे वारंवार पत्रव्यवहार करत आहेत. त्यानुसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने या उड्डाणपुलासाठी २९० कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून एमएमआरडीएला सादर केला आहे. हा अहवालही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात येईल, अशी माहिती मदान यांनी दिली.

कल्याण ग्रोथ सेंटरमधील रस्त्यांनाही मंजुरी
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील २७ गावांपैकी १० गावांमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून ग्रोथ सेंटर विकसित करण्यात येत आहे. मात्र सध्या या गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे या गावांमध्ये तातडीने रस्त्यांची कामे हाती घेण्याची मागणी डॉ. शिंदे यांनी एमएमआरडीएकडे केली होती. त्यानुसार याबाबतच्या प्रस्तावाला एमएमआरडीएने मान्यता दिली असून अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्तावही मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे.