तमाशा कलावंत शांताबाईंच्या दयनीय अवस्थेची महिला आयोगाकडून दखल, मदतीचे निर्देश

तमाशा कलावंत शांताबाई लोंढे उर्फ शांताबाई कोपरगावकर यांचा दयनीय अवस्थेतील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नगर जिल्ह्यातील कोपरगाव बसस्थानकावर त्या भीक मागून गुजराण करत होत्या. एकेकाळी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना भूरळ पाडणाऱ्या या लावणी सम्राज्ञीची अशी अवस्था पाहून नेटकरी भावूक झाले होते. शासनाने अशा कलावंतांना मदत करायला हवी अशी मागणी सर्व स्तरातून होत होती. आता शांताबाई कोपरगावकर यांच्या दयनीय अवस्थेती दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. शांताबाई यांना मदतीसाठी महिला व बाल कल्याण विभागाला सूचना दिल्या आहेत.

एकेकाळी शांताबाई यांच्या लावणी नृत्याबरोबरच त्यांच्या सौंदर्याने प्रेक्षकांना भूरळ पाडली होती. लालबाग परळचं हनुमान थिएटर त्यांनी गाजवलं. त्यांची प्रसिद्धी पाहता आणि लोकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता 40 वर्षापूर्वी कोपरगावकर बसस्थानकातील कर्मचारी अत्तार भाई यांनी ‘शांताबाई कोपरगावकर’ हा तमाशा काढला. त्यांचे तमाशाचे कार्यक्रम वाढू लागले. त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या, हातात पैसे खेळू लागले. मात्र शिक्षण नसल्याने त्यांची फसवणूक करण्यात आली.

अत्तार भाई यांनी सर्व तमाशा विकला आणि त्या उद्ध्वस्त झाल्या. यात त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. हळहळू त्यांना मानसिक आजाराने ग्रासले. त्यांना पती नाही, जवळचे नातेवाईक नसल्याने डोक्यावर हक्काचे छप्परही नाही, अशावेळी कोपरगाव बसस्थानकच त्यांचे घर झाले. शांताबाई या 75 वर्षांच्या असून त्यांचा ‘ओळख जुनी धरुन मनी’ ही लावणी गात असताना एकाने त्यांचा व्हिडीओ चित्रित करत सोशल मीडियावर अपलोड केला. त्यांच्या दयनीय अवस्थेची दखल महिला आयोगाने घेतली असून आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी, नगर यांना संपर्क करण्यात आला आहे.

तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातून समोर आल्या आहेत. आयोगाच्या वतीने तातडीने जिल्हा महिला बालविकास अधिकारी नगर यांना संपर्क करण्यात आला आहे. सध्या शांताबाई नगरच्या एका रुग्णालयात आहेत. त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे जिल्हा महिला बालकल्याण नगर यांना सांगण्यात आल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

महाराष्ट्र शासनाने कलाकारांच्या निवृत्ती वयात त्यांना समाधानाने जगता यावे यासाठी काही योजना सुरू केल्या आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मान जनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोगाने दिले आहेत, अशी माहितीही चाकणकर यांनी दिली.