मुख्यमंत्र्यांविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्या तरुणाला अटक

सामना ऑनलाईन । चेन्नई

तमिळनाडूमध्ये मुख्यमंत्र्यांविरोधात व्यंगचित्र काढणाऱ्या फ्रिलान्स कार्टूनिस्टला पोलिसांनी रविवारी चेन्नईमध्ये अटक केली आहे. जी. बाला असे अटक केलेल्या व्यंगचित्रकाराचे नाव आहे. राज्यातील तिरुनेलवेली येथे एका कुटुंबाने आत्मदहन केल्याप्रकरणी राज्य सरकारवर टीका करणारे व्यंगचित्र काढल्याच्या आरोपाखाली जी. बाला याला अटक करण्यात आली आहे.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तिरुनेलवेली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी क्राईम ब्रांचकडे संबंधित व्यंगचित्राबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, जी. बाला याच्या अटकेविरोधात सोशल मीडियावर संताप व्यक्त होत असून त्याच्या समर्थनार्थ #standwithCartoonistBala हॅशटॅग ट्विटरवर सुरू आहे.

काय आहे प्रकरण?

तिरुनेलवेलीमधील पी. इसाकिमुथू नावाच्या मजूराने आपली पत्नी आणि दोन मुलांसह जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसबाहेर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. यात त्यांची पत्नी सुब्बुलक्ष्मी, ४ वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर, इसाकिमुथू स्वत: ७५ टक्के भाजले होते. इसाकिमुथू यांनी सावकाराकडून पावने दोन लाखांचे कर्ज घेतले होते. त्यांनी सावकाराला व्याजासह दोन लाख रुपये परत केले होते, मात्र सावकार आणखी दोन लाखांची मागणी केल्याने त्यांनी आत्मदहनाचे पाऊल उचलले होते.

याप्रकरणी इसाकिमुथूचा भाऊ गोपीने सांगितले की, सावकाराच्या त्रासाला कंटाळून इसाकिमुथू ६ वेळा जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात चकरा मारल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही पोलिसांनी सावकाराविरोधात कोणताही कारवाई केली नाही. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गोपीने केला आहे.