तामीळनाडूतील राजकीय ‘जलिकट्टू पार्ट-२’

>>निलेश कुरकर्णी<<

दिल्लीश्वरांच्या कृपेने तामीळनाडूच्या राजकारणात सुरू असलेल्याजलिकट्टूचे शो रजनीकांतच्या सिनेमापेक्षाही सुपरडुपर हिट ठरण्याची चिन्हे आहेत. जयललितांच्या निधनानंतर निर्नायकी झालेल्या तामीळनाडू आणि अण्णा द्रमुकला ताब्यात घेण्याचे प्रयत्नजलिकट्टू पार्टमध्ये झाले. आता त्यापेक्षाही चित्तथरारकजलिकट्टू पार्टसजला आहे. दिल्लीश्वरांच्या मार्गदर्शनाखालीपार्टमध्ये परस्परांशी लढणारे पनीरसेल्वम पलानीस्वामी हे दोन विरोधक महाराथीपार्टमध्ये संयुक्त हीरो बनले आहेत तर तुरुंगाची हवा खाणाऱ्या आणि पदर खोचून भाजपच्या सत्ताकांक्षेला आव्हान देणाऱ्या शशिकलाबाई या व्हिलन बनल्या आहेत. त्यात चौकशांचे शुक्लकाष्ठ घेऊन फिरणाऱ्या दिनकरन यांनी १९ आमदारांना घेऊन पुद्दुचेरी गाठून ट्विस्ट आणला आहे. दोन भागात या राजकीय जलिकट्टूचे कथानक साकारले असले तरी त्यात कोणबाहुबलीठरतो, ते भविष्यातच कळू शकेल.

कर्नाटकच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप उताणा पडेल आणि काँग्रेसच्या ‘आयसीयू’मध्ये गेलेल्या पेशंटची ‘नाडी’ लागेल असे राजकीय भाकीत सर्व्हेतून पुढे आले आहे. त्यामुळे ‘काँग्रेसमुक्त हिंदुस्थान’च्या सत्ताधाऱ्यांच्या नाऱ्यातील हवा निघून जाण्याची चिन्हे आहे. त्यामुळे दिल्लीधीश चांगलेच धास्तावले आहेत. कर्नाटकची मोहीम अपयशी ठरण्याची चिन्हे असल्याने तामीळनाडूच्या दक्षिण स्वारीवर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. जयललितांशी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अगदी घरोब्याचे संबंध होते. या संबंधांचा हवाला देऊनच अण्णा द्रमुक खिशात टाकण्याचा प्रयत्न अम्माच्या निधनानंतर सातत्याने होतो आहे. सुरुवातीला शशिकलाबाईंनी दिल्लीश्वरांची डाळ शिजू दिली नाही. मात्र अचूक टायमिंग साधत त्यांची बंगळुरूच्या कारागृहात रवानगी करण्यात आली तर त्यांचे भाचे दिनकरन यांच्यामागे चौकशांचा भुंगा लावण्यात आला. शशिकलाबाईंच्या कच्छपी लागून मुख्यमंत्री बनलेल्या पलानीस्वामींना बंडखोर पनीरसेल्वमशी गळाभेट घेण्याचेही दिल्लीहून सुचविण्यात आले. त्यामुळे अनेक वर्षे ज्यांनी ज्युनियर म्हणून काम केले त्या पलानीस्वामींच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्यास पनीरसेल्वमही तयार झाले. अर्थात अफलातून दिग्दर्शित केलेल्या या राजकीय जलिकट्टूच्या पार्ट-२चा सुखान्त होईल या आशेवर असलेल्या भाजपच्या हायकमांडचा दिनकरन यांनी हिरमोड केला आहे. १९ आमदारांना हाताशी घेऊन त्यांनी राजकीय प्रेमाचा त्रिकोण पुसण्याचा प्रयत्न केला आहे. पलानीस्वामी आणि पनीरसेल्वम यांची हातमिळवणी करण्यासाठी दस्तुरखुद्द राज्यपाल महोदय तिथे पोहचले होते. मात्र ‘ही दोस्ती तुटायची नाही’ या आणाभाकांचे शब्द हवेत विरत नाहीत तोवरच या सरकारवर अस्थैर्याचे ढग दाटून आले. राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा मित्र नसतो हे अम्मांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने अण्णा द्रमुकची कुत्तरओढ सुरू आहे यावरून लक्षात येतेच. तामीळनाडू व पर्यायाने अण्णा द्रमुकची लचकेतोड थांबवा. तीच खरी जयललितांना श्रद्धांजली ठरेल. एवढा मित्रधर्म तरी दिल्लीश्वर पाळतात का ते बघूया.

काँग्रेसचे राष्ट्रपती भवनापासून ‘‘सुरक्षित अंतर…’

राष्ट्रपती हे देशाचे संवैधानिक प्रमुख असतात याचा बहुधा काँग्रेससारख्या देशातील सर्वात जुन्या पक्षाला विसर पडलेला दिसतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे काँग्रेसने राष्ट्रपती भवनाशी राखलेले ‘सुरक्षित अंतर.’ प्रणव मुखर्जी राष्ट्रपती असताना काँग्रेसची मंडळी नेहमीच त्यांचे मार्गदर्शन घ्यायला जात असे. काँग्रेसच काय प्रणवदा एकप्रकारे देशाचेच संकटमोचक होते आणि पक्षातीतही होते. त्यामुळे प्रणवदांकडे भेटायला जाणाऱ्यांचा राबता असायचा. साधारणतः महिनाभरापूर्वी महामहिम रामनाथ कोविंद राष्ट्रपती झाले आणि राजधानीतले चित्रच पालटले. स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती भवनातली कार्यक्रमाला सोनिया गांधी यांनी जरूर हजेरी लावली होती. मात्र विरोधी पक्षाच्या अध्यक्षा या नात्याने ती निव्वळ औपचारिकता होती. मात्र कोविंद राष्ट्रपती झाल्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने त्यांची आजवर औपचारिक भेटही घेतली नाही. वीरभद्रसिंगांचा अपवाद वगळता काँग्रेसच्या दुसऱ्या कोणत्या मुख्यमंत्र्यानेही त्यांची ‘शिष्टाचार भेट’ घेतलेली नाही. कोविंद यांच्याबद्दल एवढे ‘सुरक्षित अंतर’ राखण्यामागचे गमतीदार कारण एका काँग्रेस नेत्याने खासगीत सांगितले. लालकृष्ण आडवाणी राष्ट्रपती होतील अशी आमची खात्री होती आणि आडवाणींशी सोनियांपासून सामान्य काँग्रेसजनांपर्यंत एकप्रकारचे चांगले संबंध आणि संवाद होता. मात्र मोदींच्या खास मर्जीतले कोणाच्याही ध्यानीमनी नसणारे कोविंद राष्ट्रपती झाल्याने आमची अडचण झाली आहे. राज्यसभेचे खासदार आणि प्रवक्ते असतानाही कोविंद फारसे कोणालाच माहिती नव्हते. ते लो प्रोफाइल राहिले. त्यामुळे त्यांना धडपणे ओळखणारे लोकही आमच्या पक्षात नाहीत. मग संवाद कसा साधला जाणार? असा त्या नेत्याचा सवाल होता. राष्ट्रपती होण्यापूर्वी कोविंदांना कोणी ओळखत नव्हते हे एकवेळ मान्य केले तरी आता ते देशाचे राष्ट्रपती आहेत आणि त्यांचा सन्मान हा राखला गेलाच पाहिजे. त्यामुळे काँग्रेसने हा ‘सुरक्षित अंतरा’चा बोर्ड काढून ठेवलेलाच बरा!

मध्य प्रदेशातीलटॉयलेट : एक प्रेमकथा…’

अक्षयकुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा सिनेमा सुपरहिट ठरत असताना मध्य प्रदेशमध्ये भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेला टॉयलेट एक प्रेमकथा त्याहूनही वरताण ठरला आहे. पक्षविस्ताराच्या निमित्ताने अमितभाई सध्या ‘भारत एक खोज’प्रमाणे फिरत आहेत. त्यांच्या पक्षाचा विस्तार वगैरे होतो की नाही हा वेगळा मुद्दा असला तरी अमितभाई जिथे जिथे मांडी घालून कार्यकर्त्यांच्या घरी जेवायला बसतात तिथे काही ना काही वाद होतोच. पश्चिम बंगालमध्ये अमितभाईंनी असेच एका आदिवासीच्या घरी जेवण घेतले. अगदी रसगुल्ल्यांवर तावही मारला. मात्र अमितभाई जेवलेले केळीचे पान उचलून आवराआवर होत नाही तोच यजमान दांपत्याने तृणमूलमध्ये प्रवेश केल्याची बातमी आली. आता मध्य प्रदेशच्या राजधानीत कमलसिंग उइके या आदिवासीच्या घरी अमितभाईंचे पाय लागले. कमल यांनी ऐपतीप्रमाणे दालपुरी, कढी, चावल, हलवा असा बेत केला. अमितभाईंनीही प्रेमाने भोजन घेतले, मात्र मीडियावाल्यांनी अमितभाई जेवले त्या कार्यकर्त्यांच्या घरीच शौचालय नसल्याची शोधपत्रकारिता केली. त्यातही गमतीचा भाग म्हणजे या भोजनाला जाण्यापूर्वीच अमित शहा यांनी मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून देशभरात साडेचार कोटी शौचालये बांधली गेली असून ‘बघा बघा आपला देश कसा आता स्वच्छ होत आहे’ असे ठामपणे पत्रकारांना सांगितले होते. हे शब्द हवेत विरत नाहीत तोच ‘खुलें मे ‘शौचमुक्त भोपाळ’ची पोलखोल झाल्याने मुख्यमंत्री चौहान यांच्यासह अमितभाई तोंडघशी पडले. त्यानंतर कमल यांच्या पत्नीला आपण शौचालयासाठी अर्ज केला होता त्याची प्रक्रिया सुरू आहे असे सांगावे असे सांगण्यात आले. त्या बिचाऱ्या अशिक्षित बाईला हा काय प्रकार माहिती नसल्याने तिने सहा महिने झाले तरी महापालिकेने अर्जावर काहीच केले नाही अशी प्रतिक्रिया मीडियाला दिली. त्यामुळे अमितभाईंच्या मध्य प्रदेश दौऱ्याचा बेरंगच झाला.