अरण्य वाचन…तानसा


अनंत सोनवणे,[email protected]

मुंबई शहराला पाणी पुरवणाऱया तानसा तलावाचं नाव सर्वांना माहीत असेल. याच तानसा तलावाच्या भवताली वसलंय तानसा वन्य जीव अभयारण्य.

एखादा लाँग वीकएण्ड मिळाला की मुंबईकर असं एखादं ठिकाण शोधू लागतात, जे मुंबईपासून फारसं लांब नसेल. जिथे गर्दी, कोलाहल नसेल. त्याचबरोबर निसर्गाचाही आनंद घेता येईल. तानसा वन्यजीव अभयारण्य हे असेच ठिकाण आहे. मुंबईपासून अवघ्या ९५  कि. मी. अंतरावर असलेलं हे सुंदर, संपन्न जंगल दुर्दैवानं मुंबईकरांच्या खिजगिणतीतही नाही.

मुंबई शहराला पाणी पुरवणाऱया तानसा तलावाचं नाव सर्वांना माहीत असेल. याच तानसा तलावाच्या भवताली वसलंय तानसा वन्यजीव अभयारण्य. हा तलाव आणि त्याचं पाणलोट क्षेत्र म्हणजे वन्यजीव आणि पक्ष्यांच्या विशेष आकर्षणाचे केंद्र. या पाण्यावर पोसलेलं सभोवारचं जंगल दक्षिणी दमट शुष्क पानगळी प्रकारचं आहे. १९७० साली तानसा वन्यजीव अभयारण्याची निर्मिती झाली. अभयारण्याचं जंगल शहापूर, वाडा, खर्डी आणि वैतरणाच्या जंगलांनी वेढलंय. भरपूर वृक्ष-झुडपं-वेली आणि मुबलक पाणी यामुळे वन्यजिवांसाठी हा परिसर वरदान ठरलाय.

मुंबई आणि ठाणे शहरांपासून जवळ असल्याने या शहरांमधल्या निसर्गप्रेमींचं हे आवडीचं ठिकाण आहे. इथल्या जंगलात बेहडा, हिरडा, साग, खैर, बाभूळ, आंबा, पिंपळ, बहावा, ऐन, कदंब इत्यादी वृक्ष-वनस्पती पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी बांबूची बेटंही आहेत. अभयारण्यातील वैभव पाहताना डोळय़ांचं पारणं फिटतं.

tanasa-1

तानसा वन्यजीव अभयारण्य पर्यटकांसाठी वर्षभर खुले असते. पण नोव्हेंबर ते मे या काळात भेट दिली, तर विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी यांचं निरीक्षण करण्याची संधी मिळते. सुदैवाने या अभयारण्यात पायी फिरायला परवानगी आहे. त्यामुळे मनसोक्त वन्यजीव निरीक्षण करता येतं. अर्थात त्यासाठी वनविभागाची परवानगी व सोबत गाईड घेणं आवश्यक असतं.

तानसाच्या परिसरात बिबळय़ाचा वावर आहे. हा लाजरा, परंतु चतुर प्राणी शोधूनही पटकन दिसत नाही, इतका तो जंगलाच्या रंगसंगतीशी एकरूप झालेला असतो. तो आपल्याला दिसत नसला तरी कुठून तरी तो आपल्याला पाहतो आहे, ही भावना इथं हिंडताना मनात आल्याशिवाय राहत नाही. नशीब बलवत्तर असेल तर एखादा बिबळय़ा अगदी निवांतपणे तुमच्या समोरून रस्ता ओलांडून जाईल! बिबळय़ाशिवाय इथं इतरही सुमारे ५० प्रजातींचे वन्यप्राणी आढळतात. त्यात सांबर, चितळ, काकर, चौशिंगा, उंदीर, हरिण, रानडुक्कर, कोल्हा, तरस,  माकड, वटवाघूळ इत्यादी प्राण्यांचा समावेश होतो. तानसा अभयारण्य पक्षी निरीक्षकांच्या विशेष आवडीचं आहे. कारण इथं २५० हून अधिक प्रजातींचे पक्षी पाहायला मिळतात. नवरंग, हळद्या, तितर, खाटीक, मुनिया, बुलबुल, टकाचोर इत्यादी प्रजातींचा त्यात समावेश होतो. पाणलोट क्षेत्रामुळे रंगीत करकोचा, पांढऱया मानेचा करकोचा, लहान व मोठा पाणकावळा, राखी बगळा, लाजरी पाणकोंबडी, जांभळी पाणकोंबडी इत्यादी प्रकारचे पाणपक्षीही इथे आढळतात. तसेच इथे अनेक प्रकारच्या पाली, रानसरडा, घोरपड, नाग, अजगर, घोणस, फुरसे इत्यादी सरपटणारे प्राणीही दिसू शकतात.  मुंबई-ठाणे परिसरातल्या वन्यजीव छायाचित्रकारांसाठी   तानसा अभयारण्य जणू नंदनवनच.तुम्हीही येत्या सुट्टीत तानसा अभयारण्याला भेट द्यायला आणि इथल्या वन्य जीवनाचा आनंद लुटायला काहीच हरकत नाही.

तानसा वन्य जीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण विविध प्रकारचे पक्षी.

जिल्हा ठाणे.

राज्य महाराष्ट्र.

क्षेत्रफळ  ३२० चौ. कि. मी.

निर्मिती -१९७०

जवळचे रेल्वे स्थानक आटगाव (१३ कि. मी.).

जवळचे विमानतळ मुंबई (९० कि. मी.).

निवास व्यवस्था वनविभागाचं विश्रामगृह.

सर्वाधिक योग्य हंगाम नोव्हेंबर ते मे.

सुट्टीचा काळ नाही.

साप्ताहिक सुट्टीचा दिवस नाही.